MPSC चा मोठा निर्णय! गुणवत्ता यादी, पसंती क्रम आणि 'Opting Out' च्या विकल्पाची अंमलबजावणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 03:22 PM2022-02-12T15:22:20+5:302022-02-12T15:25:04+5:30
आयोगाचा हा सर्वाधिक महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे
पुणे: आज एमपीएससीने (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०१९ परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली. पहिल्यांदाच आयोगाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी लावून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम अथवा भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प उपलब्ध करून दिला आहे. यापूर्वी गुणवत्ता यादी, पसंती क्रम आणि भरती प्रकियेतून बाहेर पडण्याची सुविधा हे तीन महत्वपूर्ण निर्णय आयोगाने घेतले होते, त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे.
आयोगाचा हा सर्वाधिक महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. यामुळे आयोगाच्या परीक्षा पद्धतीत आणखी पारदर्शकता येऊन होतकरू मुलांना संधी मिळतील. यामुळे आता एमपीएससी जाहीरातीत जेवढ्या जागा काढते त्या सर्व जागा भरल्या जातील. एका जागेवर एकच विद्यार्थी निवडला जाईल. यापूर्वीच्या परीक्षा पद्धतीमुळे बऱ्याच जागा शिल्लक राहत होत्या. आयोगाच्या या निर्णयाचे विद्यार्थ्यांकडूनही स्वागत होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. यामुळे जाहीरातीतील सर्व जागा भरल्या जातील. राज्यातील होतकरू विद्यार्थ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होईल. एमपीएससीने घेतलेला हा निर्णय भारतात कोणत्याही इतर आयोगाकडून घेतला गेला नाही.
-सुनिल अवताडे (सहसचिव, एमपीएससी)
जा. क्र. 17/2019 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच पसंतीक्रम सादर करणे व भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी वेबलींक सुरू करण्यात येत आहे. https://t.co/zVAQXFOsiypic.twitter.com/BPkUSDifFQ
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) February 12, 2022