शरद पवारांनी शब्द पाळला! MPSCचे आंदोलक विद्यार्थी-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीबाबत मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 10:53 PM2023-02-22T22:53:00+5:302023-02-22T22:53:50+5:30
MPSC: शरद पवारांनी रात्री आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीबाबत ग्वाही दिली होती.
पुणे: वर्णनात्मक परीक्षा पद्धत २०२५ पासून लागू करावी याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला. मात्र, अद्याप महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले. झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात एकत्र जमून त्यांनी धरणे आंदोलन केले. जोपर्यंत एमपीएससी वर्णनात्मक परीक्षेबाबत निर्णय घेणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दखल घेतली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक करण्याची ग्वाही देण्यात आली होती.
एमपीएससी जोपर्यंत अधिकृतपणे नोटिफिकेशन काढणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यावर विद्यार्थी ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार, आंदोलक विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक होणार आहे. बैठकीची वेळ आणि ठिकाण निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे.
MPSCचे आंदोलक विद्यार्थी-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीबाबत मोठा निर्णय
विद्यार्थी प्रतिनिधी आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीबाबत मोठा निर्णय झाला आहे. बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. शरद पवार यांनी विद्यार्थ्यांना सांगितल्यानुसार, पाच विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळातसोबत सह्याद्री अतिथीगृहावर उद्या (गुरुवार) संध्याकाळी पाच वाजता बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तत्पूर्वी शरद पवार यांनी अचानक आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. या आंदोलनाची सरकारला दखल घ्यावी लागेल. मुख्यमंत्र्यांसोबत येत्या दोन दिवसांत बैठक करण्याची जबाबदारी मी घेतो. यावर तोडगा काढायचा असेल, तर सरकारशी बोलावे लागेल. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी लागेल, असेही शरद पवार म्हणाले होते.
दरम्यान, अशक्य काही नाही आपण मार्ग काढू शकतो. हा प्रश्न सोडवायचा असेल तर सरकार आणि मुख्यमंत्र्यासोबत बैठक होणे गरजेचे आहे. इथे येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. त्यांच्याशी संपर्क केला असता बैठक घेण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मी स्वतः तुमच्याबरोबर असेन. आयोगाचे अधिकारी, विद्यार्थ्यांचे पाच प्रतिनिधी या बैठकीला असतील. तुमच्यावतीने कोण बैठकीला येणार त्यांची नावे द्यावीत, असे शरद पवार यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना सांगितले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"