आखाती देशांत चाकणचा कांदा , दुबई, कुवेत, मस्कतमधून मोठी मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 06:26 AM2018-03-12T06:26:24+5:302018-03-12T06:26:24+5:30
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील बाजारात सन २०१७-१८ सालामध्ये २८ फेब्रुवारीअखेर ११ लाख १९ हजार ५८२ कांदा पिशव्यांची म्हणजेच ५ लाख ६० हजार २२२ क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीतकमी ७०० व जास्तीत जास्त ४००० आणि सरासरी १८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
चाकण - खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील बाजारात सन २०१७-१८ सालामध्ये २८ फेब्रुवारीअखेर ११ लाख १९ हजार ५८२ कांदा पिशव्यांची म्हणजेच ५ लाख ६० हजार २२२ क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीतकमी ७०० व जास्तीत जास्त ४००० आणि सरासरी १८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. या वर्षात कांदा बाजारात एकूण १ अब्ज ७ कोटी ६१ लाख ३४ हजार ३५० रुपये उलाढाल झाली असून बाजार समितीला मार्केट फी च्या माध्यमातून १ कोटी ७ लाख ६१ हजार ३४२ उत्पन्न मिळाले असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती चंद्रकांत इंगवले व सचिव सतीश चांभारे यांनी दिली.
चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये आज ( दि. १० ) ४० हजार कांदा पिशव्यांची आवक होऊन कांद्याला ७०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. मागील आठवड्यापासून कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडल्यामुळे आवक मध्येही मोठी घट झाली आहे. चाकण परिसरातील शेतक-यांच्या कांद्याला आखाती देशातून मोठ्या प्रमाणावर मागणी होत असून चाकणचा कांदा दुबई, कोलंबो, दमाम, कुवेत, मस्कत या देशांमध्ये निर्यात होत आहे.
मार्केट यार्ड मध्ये गुलाब सोपाना गोरे पाटील यांच्या प्रशांत ट्रेडिंग कंपनी व जमीरभाई सुन्नुभाई काझी यांच्या जे के एक्सपोर्टर मार्फत दोन्ही अडत्यांनी कांदा उत्पादक शेतक-यांसाठी कांद्याचे निर्यात करून शेतक-यांना परदेशात बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. सध्या निर्यात व आडते आखाती देशांमध्ये विशेषत: दुबई, कोलंबो, दमाम, कुवेत, मस्कत या ठिकाणी कांदा निर्यात करीत आहेत. त्यामुळे भविष्यात कांदा उत्पादक शेतक-यांना योग्य व रास्तभाव मिळणार आहे.
लतिफभाई बद्रुद्दीन काझी यांच्या गाळ्यावर चिंचोशी येथील शेतकरी पोपट केशव मोरे या शेतक-याने आणलेल्या ५६ कांदा पिशव्यांना १००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. हा माल दिल्ली येथील तलरेजा ट्रेडिंग कंपनी या व्यापा-याने खरेदी केला आहे. तसेच कोरेगाव बुद्रुक येथील शेतकरी परसराम डावरे या शेतक-यांच्या ९९ कांदा पिशव्या प्रशांत ट्रेडिंग कंपनीने १००० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी केला आहे.
सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात चाकण मार्केट यार्ड मध्ये १३ लाख ३५ हजार ५९३ कांदा पिशव्या म्हणजेच ६ लाख ६८ हजार २३८ क्विंटल कांद्याची आवक झाली. या कांद्याला कमीत कमी ४०० व जास्तीत जास्त १०५० आणि सरासरी ६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. सन २०१६-१७ या वर्षात कांदा मार्केट मध्ये एकूण ६४ कोटी ३० लाख ९६ हजार ६२९ रुपये उलाढाल झाली असून बाजार समितीला मार्केट फी च्या माध्यमातून ६४ लाख ३० हजार ९३६ रुपये उत्पन्न मिळाले आहे.
कांदा बाजारात १ अब्ज रुपयांची उलाढाल
चालू वर्षात चाकण बाजारात ११ लाख १९ हजार ५८२ कांदा पिशव्यांची आवक
कांदा बाजारात एकूण १ अब्ज ७ कोटी ६१ लाख ३४ हजार ३५० रुपये उलाढाल
बाजार समितीला मार्केट फीच्या माध्यमातून १ कोटी ७ लाख ६१ हजार ३४२ उत्पन्न