आर्थिक गणित जुळेना...हॉटेलचे शटर उघडेना; व्यवसायाला मोठा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 10:37 PM2021-06-09T22:37:31+5:302021-06-09T22:38:07+5:30
कारवाईची भीती, कामगारांचा खर्च अशा कात्रीत व्यावसायिक
पुणे : एकीकडे शासनाने हॉटेल दुपारी चारपर्यंत सुरू ठेवण्यास तसेच रात्री ११ पर्यन्त पार्सल देण्यास परवानगी दिली आहे. मात्र, हॉटेल सुरू ठेवण्यासाठी जी वेळ दिली आहे त्या वेळेत ग्राहकच येत नसल्याने शहरातील बहुतांश व्यावसायिकांनी हॉटेल बंद ठेवणेच पसंत केले आहे. लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेल्या व्यावसायिकांना या स्थितीत हॉटेल उघडणे परवडणारे नाही. केवळ पार्सल सुविधेवर कामगारांचा खर्च भागेल एवढेच उत्पन्न सध्या मिळत असल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.
शासनाने केलेल्या नियमामधून हॉटेल व्यवसायिकांना सूट द्यावी. अन्य दुकाने चार वाजता बंद करावीत; परंतु, हॉटेल रात्री साडे अकरापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी असे पत्र शासनाला पाठविण्यात आले आहे. संध्याकाळी पाचनंतर संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची दुपारी तीनपासूनच घरी जाण्याची धावपळ सुरू होते. पोलीस आणि पालिकेची यंत्रणा कारवाई करेल अशी भीती त्यांच्या मनात असते. त्यामुळे दुपारी केवळ खाण्यासाठी हॉटेलमध्ये जाण्याचे प्रमाण सध्यातरी खूपच कमी आहे.
ज्या कमर्शियल कॉम्प्लेक्स उघडल्या आहेत तेथील रेस्टोरांत उघडले आहेत. मात्र तेथेही ५० टक्क्यांची मर्यादा असल्याने व्यवसायावरच मर्यादा आल्या आहेत. हॉटेल उघडणे हे सध्या आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. अर्धा दिवस हॉटेल उघडे ठेवले तरी कामगारांना पूर्ण दिवसाचा पगार द्यावा लागणार आहे. त्यातच ग्राहक नसल्याने तरकारीपासून सर्वच खर्च अंगावर पडत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. त्यामुळे तूर्तास तरी 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत व्यावसायिक आहेत. १ जुलैपासून काही सूट मिळते का याकडे व्यावसायिकांच्या नजरा लागल्या आहेत.
-----
हॉटेल चालकांनी त्यांच्या कामगारांचे लसीकरण सुरू केले आहे. खासगी रुग्णालयांसोबत करार करून हे लसीकरण केले जात आहे. मात्र, हा खर्चही व्यवसायिकांना परवडणारा नाही. शासनाने मोफत लस द्यायची घोषणा केली असली तरी लसींचा पुरवठा वेळेत होत नाही.
-----
पालिकेने नियमभंग केलेल्या १८ पेक्षा अधिक हॉटेलला सील ठोकले आहे. हॉटेल उघडे ठेवल्यावर ग्राहक जास्तीचे टेबल लावण्याचा आग्रह धरतात. पालिका मग कारवाई करते. हॉटेल चालकांना ग्राहकांना दुखवटा येत नाही आणि पालिकेला दण्ड भरल्याशिवाय पर्याय नसतो.
-----
हॉटेल व्यवसायिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. याबाबत आम्ही राज्य शासनासोबत पत्रव्यवहार केला आहे. रात्री साडे अकरा वाजेपर्यंत हॉटेल उघडे ठेवण्यास परवानगी मिळावी अशी आमची मागणी आहे. दुकान दुपारपर्यंत उघडे ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे तूर्तास हॉटेल बंद ठेवण्याचाच निर्णय घेण्यात आला आहे.
- गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टोरंट आणि हॉटेलियर्स असोसिएशन
-------
शासनाने अचानक हॉटेल उघडण्यास परवानगी दिली. हॉटेल चालकांकडे काम करणारे कामगार गावी गेल्याने मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यांना कळविणे आणि पुन्हा बोलावणे यात वेळ जाणार आहे. त्यातच व्यवसायासाठी दिलेली वेळ ही निरुपयोगी आहे. ५० टक्के उपस्थित आणि दुपारी चारपर्यंतची वेळ हे गणित आर्थिकदृष्ट्या न परवडणारे आहे.
- किशोर सरपोतदार, पुना गेस्ट हाऊस