अण्वस्त्र क्षेत्रात मोठा पल्ला गाठायचाय : डॉ. टेसी थॉमस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 02:02 PM2018-11-19T14:02:20+5:302018-11-19T14:06:20+5:30
प्रयत्नांना आत्मविश्वासाची आणि प्रोत्साहनाची जोड मिळाल्यास निश्चितपणे यशस्वी होता येते..
पुणे : ‘प्रयत्नांना आत्मविश्वासाची आणि प्रोत्साहनाची जोड मिळाल्यास निश्चितपणे यशस्वी होता येते. भारताने अण्वस्त्र क्षेत्रात केलेली प्रगती उल्लेखनीय असली तरी बदलत्या तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्याला आणखी बराच पल्ला गाठायचा आहे, असे सांगून बंगळूरू येथील क्षेपणास्त्र वैज्ञानिक आणि भारताच्या अग्नीपुत्री (मिसाईल वुमन आॅफ इंडिया) डॉ. टेसी थॉमस यांनी अग्नी-४ क्षेपणास्त्र प्रकल्पातील अनुभव विशद केले.
कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे महिला संशोधन राष्ट्रीय पुरस्कार’ यंदा बंगळूरू येथील क्षेपणास्त्र वैज्ञानिक आणि भारताच्या अग्नीपुत्री (मिसाईल वुमन आॅफ इंडिया) डॉ. टेसी थॉमस यांना तर ‘कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे महिला साहस राष्ट्रीय पुरस्कार’ पुणे येथील आर्टिस्ट्रीच्या वीणा गोखले आणि पुणे येथील जागृती सेवा संस्थेच्या मंगला पाटील यांना विभागून देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, महापौर मुक्ता टिळक,आयोजक सुरेश रानडे, तसेच यंदाच्या आदर्श सहचारिणी पुरस्काराच्या मानकरी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या पत्नी वैशाली माशेलकर, सिंबायोसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या पत्नी संजीवनी मुजुमदार आणि ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या पत्नी अनुराधा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. थॉमस म्हणाल्या, ‘सतत शिकत राहायचे ही आईची शिकवण आणि एका यशानंतर आता पुढे काय, याचा सतत ध्यास घ्यायचा असे प्रोत्साहन देणारे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी. जे. अब्दुल कलाम या दोन व्यक्तींनी माझे आयुष्य ख-या अर्थाने घडवले. पालकांच्या दृष्टिकोनाचा तुमच्या जडणघडणीवर खूप परिणाम होत असतो. कुटुंब गरीब आहे की श्रीमंत, याहीपेक्षा ते शिक्षित आणि ध्येयवादी आहे का, हे अधिक महत्त्वाचे असते.’
श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘समाजाच्या अनेक क्षेत्रातील व्यक्तींना मदतीची गरज असते. अनेक व्यक्ती आणि संस्था त्यांच्यासाठी काम करतात. आपण प्रत्यक्षपणे काम करू शकत नसलो, तरी अशा व्यक्ती आणि संस्थांना जमेल ती मदत करणे आपले कर्तव्य आहे. आपले दान सत्पात्री जावे, अशी प्रत्येकाची भावना असते.’
यावेळी मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘महानगरपालिकेच्या माध्यमातून समाजातील अनेक वंचित घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. बालके, किशोरवयीन मुले-मुली, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक अशा अनेक घटकांच्या विविध समस्या सोडविणे गरजेचे आहे.’
सुरेश रानडे यांनी प्रास्ताविक केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. रवि नातू यांनी आभार मानले.