लाभासाठी मोठे मिळकतदार घेतात गरिबीचे ‘सोंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:12 AM2021-06-09T04:12:05+5:302021-06-09T04:12:05+5:30

महापालिका प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील गरीब नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचारादरम्यान एक लाख रुपयांपर्यंतची सूट ...

Big landlords disguise poverty for profit | लाभासाठी मोठे मिळकतदार घेतात गरिबीचे ‘सोंग’

लाभासाठी मोठे मिळकतदार घेतात गरिबीचे ‘सोंग’

Next

महापालिका प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील गरीब नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचारादरम्यान एक लाख रुपयांपर्यंतची सूट देणाऱ्या ‘शहरी गरीब वैद्यकीय साह्य योजने’च्या गैरफायदा घेणाऱ्यांची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे़ या योजनेचा लाभ खऱ्या गरजूपेक्षा धनवानच अधिक लाभ घेत असल्याने, वारंवार मागणी केल्याने आता महापालिका ‘अ‍ॅक्शन मोड’ मध्ये आली आहे. ‘शहरी गरीब वैद्यकीय साह्य योजने’च्या सर्व कार्डधारकांची पडताळणी सुरू केली असून, गरिबीचे सोंग घेतलेल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचारात एक ते दोन लाखांपर्यंत सवलत मिळवून देणाऱ्या ‘शहरी गरीब आरोग्य योजने’चा गैरफायदा सध्या अनेक धनवानही घेत आहेत़ लाखो- करोडेचे उत्पन्न असलेल्या व्यक्तीही ‘काहींच्या’ वरदहस्तामुळे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये असल्याचे दाखवून, ‘शहरी गरीब आरोग्य योजने’चा लाभ घेत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे़ दरम्यान, गरिबांसाठी ही योजना आहे ती बंद करून चालणार नाही, म्हणून या योजनेवर महापालिका वर्षोनुवर्षे कोट्यवधी रुपये खर्च करत आले आहे़

पण आता ही योजना ‘नाकापेक्षा मोती जड’ बनली असल्याने, महापालिकेने मार्च, २०२१ पर्यंत वाटप झालेल्या तब्बल १२ हजार ५०० कार्डधारकांची पडताळणी सुरू केली आहे़ यात ज्या कार्डधारकांच्या नावे स्वत:ची मालमत्ता आहे व जे महापालिकेचा मिळकत कर भरत आहेत, अशा ६ हजार ५०० कार्डधारकांच्या ‘गरिबीची’ तपासणी सुरू करण्यात आली आहे़ यात प्रथमदर्शनी ६३२ जण हे मिळकत कर भरणा करणारे व स्वत:च्या नावे मोठी मिळकत असलेले कार्डधारक असल्याचे आढळून आले आहे़ त्यामुळे या सर्वांना ‘शहरी गरीब वैद्यकीय साह्य योजने’च्या कार्ड वापराबाबत खुलासा करण्याकरिता नोटीस पाठविण्यात आली आहे़

दरम्यान, केवळ कार्डधारकांच्याच नावे नव्हे तर, त्याच्या पत्नीच्या नावे मिळकत असलेल्यांचीही यात पडताळणी केली जाणार आहे़

--------------------------------

शासनाच्या योजनांसाठी पालिकेचे कार्ड चालणार नाही

महात्मा फुले जनआरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजना लागू असलेल्या शहरातील ११ मोठ्या रुग्णालयांमध्ये, महापालिकेच्या ‘शहरी गरीब वैद्यकीय साह्य योजने’च्या कार्डधारकांना यापुढे लाभ मिळणार नाही़, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली़

शहरात सध्या १ लाख २५ हजार पंतप्रधान जन आरोग्य योजनेचे नोंदणी केलेली कुटुुंबे आहेत़ या योजनेची आणखी व्याप्ती वाढविण्यासाठीही महापालिकेकडून प्रयत्न केले जाणार आहेत़

----------------------------

१२ हजार ५०० कार्डधारक

६ हजार ५०० कार्डधारकांची तपासणी

६३२ जणांना पाठवल्या नोटीस

------------------

Web Title: Big landlords disguise poverty for profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.