बडा माणूस बडा दिल! जेव्हा आपल्या 'पुणेकर' मित्राला भेटायला दस्तूर खुद्द रतन टाटा अवतरतात...

By दीपक अविनाश कुलकर्णी | Published: January 5, 2021 03:35 PM2021-01-05T15:35:27+5:302021-01-06T20:45:17+5:30

माणूस कितीही श्रीमंत झाला तरी त्याचे पाय जमिनीशी जोडलेले असलेले पाहिजे या वाक्याला सार्थ ठरवणारी घटना पुण्यात अनुभवायला मिळाली... 

Big man big heart! Ratan Tata's unexpected visit gave a pleasant shock to the people of Pune | बडा माणूस बडा दिल! जेव्हा आपल्या 'पुणेकर' मित्राला भेटायला दस्तूर खुद्द रतन टाटा अवतरतात...

बडा माणूस बडा दिल! जेव्हा आपल्या 'पुणेकर' मित्राला भेटायला दस्तूर खुद्द रतन टाटा अवतरतात...

Next

पुणे : रतन टाटा नाम तो सुना ही होगा! हो तेच टाटा ज्यांनी भारतीय उदयॊग क्षेत्रात आणि समाजकार्यात भरीव योगदान दिले आहे.तसेच कोरोनाकाळात सामाजिक बांधिलकी जपत केलेली कोट्यवधींची आर्थिक मदत असेल वा कोविड रुग्णालय उभारणीचे काम यातही ते कायम अग्रेसर राहिले आहे. असे हे महान व्यक्तिमत्व त्यामुळे सर्व सामान्य माणसाच्या छोट्या मनात मोठे घर करून गेले. माणूस कितीही श्रीमंत झाला तरी त्याचे पाय जमिनीशी जोडलेले असलेले पाहिजे या वाक्याला सार्थ ठरवणारी घटना पुण्यात अनुभवायला मिळाली.

कोथरूडमधील गांधीभवनाशेजारील वूडलँड सोसायटी हे स्थळ...वेळ दुपारी तीनची..कोणताही बडेजाव किंवा लवाजमा सोबत न आणता ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा हे आजारी माजी कर्मचाऱ्याला भेटायला मुंबईहून थेट पुण्याला गेले. टाटा भेटायला गेलेला मित्र दोन वर्षांपूर्वी टाटा समूहासाठी काम करत होता. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून ते आजारी होते. मुंबईहून पुण्याला आलेल्या रतन टाटा यांनी या आजारी कर्मचाऱ्याची आवर्जुन भेट घेतली. या भेटीत टाटांनी कर्मचाऱ्याच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. तसेच टाटा यांनी आजारी कर्मचाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाचा खर्च आणि मुलांच्या शिक्षणाची काळजी घेण्याचं आश्वासन दिलं आहे. 
 दोघांच्या भेटीचा फोटो सोसायटीत राहणाऱ्या एकाने ट्विटरवर टाकला आहे.

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे वूडलँड सोसायटीत राहणारे इनामदार म्हणून गृहस्थ टाटांच्या कंपनीत कर्मचारी म्हणून काम करत होते. तेव्हापासून त्यांची मैत्री आहे. रविवारच्या भेटीत टाटांच्या इनामदार यांच्याशी जवळपास पाऊण तासभर गप्पा रंगल्या. तसेच आपल्या कर्मचारी मित्राला उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देत टाटा अगदी सहजपणे माघारी परतले. मात्र ज्येष्ठ उद्योगपती टाटा वूडलँड सोसायटीत आले आहे ही चर्चा तोपर्यंत वाऱ्यासारखी पसरली अन् सोसायटीत तोबा गर्दी जमा व्हायला सुरुवात झाली. पण टाटा माघारी परतल्याची माहिती मिळाल्यावर अनेकांची घोर निराशा झाली.

सोसायटीतील एका महिलेने सांगितले की, रतन टाटा हे आपल्या मित्राला भेटायला वूडलँड सोसायटीत आले होते. पण ही भेट अगदी अल्पावधी आणि आमच्यासाठी तितकीच अनपेक्षित अशीच होती. मात्र या सदिच्छा भेटीदरम्यान कुठलाही बडेपणाचा आम्हाला पाहायला मिळाला नाही. त्यामुळेच ते आल्याची कल्पना देखील कोणाला आली नव्हती.

 

सोसायटीचे अध्यक्ष अभिजित मकाशीर म्हणाले , माझे काम आटोपून मी रविवारी दुपारी सोसायटीत परतलो होतो. तितक्यात टाटा मोटर्सच्या दोन नव्या गाड्या समोर दिसल्या.आणि अचानक रतन टाटा गाडीतून उतरले व तेवढ्याच वेगाने ते झट की पट लिफ्टमध्ये देखील शिरले.दोन मिनिटं विश्वासच बसेना आहे सत्य आहे की भास.. पण ते रतन टाटाच होते. त्यांची विनम्रता व साधेपणा वाखाणण्याजोगा होता. परत जाण्यासाठी ते जेव्हा पार्किंगमध्ये आले तेव्हा मी आणि मुलगी आदिश्री त्यांना भेटलो. अवघ्या काही क्षणांच्या भेटीत रतन टाटांनी आम्हाला स्वत:च्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, त्यापासून कधीही विचलित होऊ नका असा कानमंत्रही दिला असल्याचे मकाशीर यांनी सांगितले. 

Web Title: Big man big heart! Ratan Tata's unexpected visit gave a pleasant shock to the people of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.