आंबेगाव तालुक्यात मतदार याद्यांमध्ये मोठा गोंधळ

By admin | Published: February 22, 2017 01:53 AM2017-02-22T01:53:02+5:302017-02-22T01:53:02+5:30

आंबेगाव तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सरासरी ७१ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच

A big mess in voters lists in Ambegaon taluka | आंबेगाव तालुक्यात मतदार याद्यांमध्ये मोठा गोंधळ

आंबेगाव तालुक्यात मतदार याद्यांमध्ये मोठा गोंधळ

Next

घोडेगाव : आंबेगाव तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सरासरी ७१ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदान करण्यासाठी ग्रामस्थांनी रांगा  लावल्या होत्या.
प्रशासनातर्फे स्लिपा सर्व मतदारांपर्यंत न पोहोचल्याने, मतदारयादीत नाव शोधण्यामध्ये कार्यकर्त्यांचा खूप वेळ गेला. तसेच मतदारयादीतील चुकांमुळे व मतदारयादीत नाव नसल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. मतदानाच्या आदल्या दिवशी सायंकाळी मतदारांच्या स्लिपा बीएलओ, तलाठी, ग्रामसवेक यांनी वाटायला सुरुवात केल्याने त्या सर्व मतदारांपर्यंत पोहोचल्या नाहीत. स्लिपा न मिळाल्याने मतदानासाठी येणाऱ्या मतदाराला आपले नाव व क्रमांक शोधण्यासाठी धावपळ करावी
लागत होती.
मतदान केंद्राबाहेर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या टेबलवर जास्त गर्दी दिसत होती. त्यामुळे सकाळी ९.३० पर्यंत अवघे ९.३२ टक्के मतदान झाले. काही राजकीय पक्षांनी लॅपटॉप लावून त्याद्वारे नाव शोधण्याची शल्लक लढवली.
तसेच मतदारयाद्यांमधील चुकांमुळे अनेक मतदार हैराण झाले होते. मतदारयादीत नाव आहे, तर फोटो चुकीचा छापला गेला, मतदारयादीत नावच नाही, दुसऱ्या मतदान केंद्राच्या यादीत नाव असे अनेक प्रकार आढळून आले. त्यामुळे मतदारांची धावपळ होत होती. यामध्ये अनेकांना मतदानापासूनही वंचित राहावे लागले. तसेच आठशे मतदारांची मतदान केंद्रे बनविण्यात आली असल्याने गावागावात मतदान केंद्रांवर गर्दी दिसत नव्हती. खूप कमी ठिकाणी मतदानासाठी रांगा लागलेल्या दिसल्या. तसेच मतदानही लवकर लवकर होत होते. त्यामुळे मतदान केंद्र अधिकाऱ्यांवर ताण आला नाही. तसेच आंबेगाव तालुक्यात ३ ठिकाणी मतदान मशिनमध्ये बिघड झाला व तत्काळ येथे नवीन मशिन बसविण्यात आली.

मंचर : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मंचर पंचायत समिती गणासाठी सुमारे ६९ टक्के मतदान झाले. मतदान संपल्यानंतर शहरात घोषणाबाजी झाली. एका अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांनी निकालाआधीच फटाके वाजवले.
मंचर पंचायत समिती गणासाठी चुरशीचे मतदान झाले. या गणात बंडखोरी झाल्यामुळे येथील लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मतदानाची टक्केवारी सुमारे ६९.१० टक्के राहिली आहे. शिवसेनेचे सुनील बाणखेले, राष्ट्रवादीचे बाळासाहेब बाणखेले, भाजपाचे संजय थोरात, काँग्रेसचे उमेश पांचाळ याबरोबरच शिवसेनेचे जिल्हा सल्लागार राजाराम बाणखेले यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. बजरंग दलाचे तालुका अध्यक्ष सुहास बाणखेले यांनीही अपक्ष उभे राहत वातावरणनिर्मिती केली होती. या सर्व घडामोडींमुळे मंचर गण विशेष चर्चेत होता.
मंचर गणातील १७ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. मतदार दिवसभर मोठ्या संख्येने येत होते. मंचर मोरडेवाडी तर दोन मतदान केंद्र वडगाव व एक मतदान केंद्र वाळुंजवाडी येथे होते. मतदानाच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. काही मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. दरम्यान मतदान संपल्यानंतर मराठी शाळेसमोर घोषणाबाजी झाली. या वेळी मोठा जमाव जमला होता. अपक्ष उमेदवारांच्या समर्थकांनी निकालापूर्वीच फटाके वाजवले. तालुक्यातील काही गावांतील मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे खडकी ८० टक्के, महाळुंगे पडवळ ७० टक्के, कळंब ७४ टक्के याप्रमाणे मतदान झाले आहे. वडगाव काशिंबेग - ७६ व वाळुंजवाडी येथे ७८ टक्के मतदान झाले आहे.

Web Title: A big mess in voters lists in Ambegaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.