पुण्यात विनोदी पोस्टरबाजी : भाजपला विरोध करायला गेले आणि त्यांचाच प्रचार करून आले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 07:44 PM2019-07-29T19:44:27+5:302019-07-29T20:09:14+5:30
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश देणे आहे असे पोस्टर पुण्यातील हडपसर भागात लावण्यात आले आहेत. यात काही नियम व अटीही देण्यात आल्या असून सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल झाले आहेत.
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश देणे आहे असे पोस्टर पुण्यातील हडपसर भागात लावण्यात आले आहेत. पण या पोस्टरखाली भाजपचा सदस्य नोंदणी क्रमांक दिल्यामुळे ही उपरोधिक मोहीम पोस्टर लावणाऱ्यांवर उलटण्याची शक्यता आहे. मात्र संपर्क क्रमांक तोच ठेवल्यामुळे भाजपची फुकट जाहिरात झाली आहे. यात काही नियम व अटीही देण्यात आल्या असून सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल झाले आहेत. फक्त पुण्यातच नव्हे तर राज्यातील अनेक शहरात असे पोस्टर लावण्यात आल्याचे हळूहळू समोर येत आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतर करून भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे या दोनही पक्षांना मोठे भगदाड पडले असून येत्या काही दिवसात अजूनही काही आमदार सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. अशावेळी विरोधी पक्षांनी मात्र 'ज्यांना आमच्याकडे भ्रष्टाचारी म्हटले जाते त्यांना तिथे कसे घेतले जाते' असा प्रश्न निर्माण केला आहे.
या पोस्टरमध्ये ''ईडी व इन्कम टॅक्सची नोटीस आलेल्यांना प्राधान्य, भ्रष्टाचाराचा अनुभव असल्यास पहिली पसंती, सहकार क्षेत्र बुडवल्याचा अनुभव हवा' या अटींचा समावेश आहे. तसेच विचारधारेची कोणतीही अट नाही, आमच्याकडे जागा फुल झाल्यास मित्रपक्षात ऍडजेस्ट करण्यात येईल असेही यात लिहिले आहे.
पुण्यातील हडपसर भागात एका नगरसेवकाने लोकमतशी तब्बल १२ ठिकाणी हे पोस्टर लावले आहेत. याबाबत ते लोकमतशी बोलताना म्हणाले की, 'हे पोस्टर कोणाच्या संकल्पनेतून आले माहिती नाही. पण सगळीकडे व्हायरल होत आहेत. भाजपच्या दुतोंडी भूमिकेला उत्तर म्ह्णून आम्ही हे पोस्टर लावले आहेत. एकेकाळी आमच्याकडे असलेले नेते भाजपला भ्रष्टाचारी दिसत होते. आता मात्र ते त्यांच्याकडे गेल्यावर ते जणू 'शुद्ध' झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या सदस्य नोंदणी जाहिरातीला उत्तर म्हणून हे पोस्टर बनवले. त्या खाली भाजपच्या सदस्य नोंदणीचा क्रमांक देण्यात आला आहे'.
या जाहिरातीत दिलेला संपर्क क्रमांक उत्सुकतेपोटी कोणाचा आहे म्हणून अनेकजण डायल करत आहेत. असे केल्यास मिस कॉलद्वारे थेट भाजपची सदस्य नोंदणी होत आहे. त्यामुळे हा प्रकार भाजपला टोला लागवण्यासाठी की त्यांचा प्रचार करण्यासाठी पोस्टर लावण्यात आले आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे.