मोठी बातमी! अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 02:52 PM2023-06-25T14:52:12+5:302023-06-25T14:58:22+5:30
कवी प्रवीण दवणे यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा असताना डॉ. शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब
श्रीकिशन काळे
पुणे : आगामी अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. कवी प्रवीण दवणे यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा असताना डॉ. शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. शोभणे हे कथाकार, कादंबरी लेखक आणि समीक्षक आहेत.
सध्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या वतीने शनिवारी पुण्यात बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये राज्यातून आलेल्या नावांवर चर्चा करण्यात आली. या नावांमध्ये जेष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे आणि जेष्ठ समीक्षक बाळकृष्ण कवठेकर यांचा समावेश होता. संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया बंद करून साहित्य महामंडळ आता संमेलनाध्यक्षाची सन्मानाने निवड करते. त्यानूसार यंदा शोभणे यांची निवड केली आहे. दरम्यान साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे या आज पुण्यात साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेऊन डॉ. शोभणे यांच्या नावाची घोषणा करणार आहेत.
शोभणे यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये उत्तरायण'साठी महाराष्ट्र फाऊंडेशन(अमेरिका)चा पुरस्कार, 'उत्तरायण'साठी मारवाडी प्रतिष्ठानचा घनश्यामदास सराफ पुरस्कार, 'उत्तरायण'साठी विदर्भ साहित्य संघाचा पु.य. देशपांडे कादंबरी पुरस्कार, सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.