Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 11:27 AM2024-05-10T11:27:44+5:302024-05-10T11:29:34+5:30
डॉ. दाभोलकर मॉर्निंग वॉकला गेले असताना २० ऑगस्ट २०१३ रोजी त्यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला.....
पुणे : आज शुक्रवारी (दि. १०) अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी होत आहे. यापूर्वी जिल्हा व सत्र न्यायालयात यावर सुनावणी सुरू होती. ती आता पूर्ण झाल्याने आज या प्रकरणाचा निकाल लागला. या निकालानुसार वीरेंद्र तावडेला निर्दोष मुक्त करण्यात आले तर सचिन प्रकाशराव अंदूरे आणि शरद भाऊसाहेब कळसकर यांना जनमठेप आणि पाच लाख दंडांची शिक्षा देण्यात आली आहे. तसेच डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालय म्हणाले, कोणाचाही खून होणे ही दुर्देवी घटना आहे. साक्षीदाराची उलट तपासणी घेताना आरोपीच्या वकिलांकडून खुनाचा समर्थन करण्याची वक्तव्य करण्यात आली ती दुर्देवी आहेत. त्यावर त्यांनी विचार करावा असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
डॉ. दाभोलकर मॉर्निंग वॉकला गेले असताना २० ऑगस्ट २०१३ रोजी त्यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. या घटनेने अवघे राज्य हादरले. दाभोलकरांच्या खुनानंतर तब्बल आठ वर्षांनी हा खून खटला सुरू होण्यास मुहूर्त लागला. खुनाचा तपास पूर्ण होऊन पुण्यातील विशेष न्यायालयाने ५ आरोपींविरोधात आरोप निश्चित केले आणि खटल्यास सुरुवात झाली. जवळपास अडीच वर्षांपासून हा खटला चालू होता.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला होता. सुरुवातीच्या काळात पुणे पोलिस या खुनाचा तपास करीत होते. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. १५ सप्टेंबर २०२१ रोजी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चित करण्यात आले. तावडे, अंदुरे, कळसकर आणि भावे यांच्यावर भारतीय दंडसंहिता (आयपीसी) कलम ३०२ (हत्या), १२० (बी) (गुन्ह्याचा कट रचणे), ३४ नुसार आणि शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत आणि यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. यातील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे दोन आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत.
दरम्यान, सुरुवातीला या खटल्याची सुनावणी वर्षभर जिल्हा न्यायाधीश एस.आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू होती. त्यानंतर नावंदर यांची बदली झाल्याने सध्या पी.पी. जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी या प्रकरणात २० साक्षीदार तपासले. बचाव पक्षाचे वकील प्रकाश साळसिंगीकर, वीरेंद्र इचलकरंजीकर आणि सुवर्णा आव्हाड यांनी काम पाहिले. त्यांनी २ साक्षीदार न्यायालयात उभे केले. आता या खटल्याचे कामकाज पूर्ण झाले असून, आज दाभोलकर खटल्याचा निकाल लागला.