बारामती गोळीबार प्रकरणातील मोठी बातमी; जखमी रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 09:44 AM2024-06-29T09:44:15+5:302024-06-29T09:44:42+5:30
निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी लागल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
सोमेश्वरनगर : दि. २९ लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती तालुक्यातील निंबुत येथे सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या निवासस्थानी दि. २७ रोजी रात्री गोळीबार झाला होता. यामधील फलटण येथील रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान दि. २८ रोजी रात्री २ वाजता पुणे येथे मृत्यू झाला आहे.
शहाजीराव काकडे यांचा मुलगा गौतम काकडे व फलटण येथील रणजित निंबाळकर यांचा शर्यतीच्या सुंदर नावाच्या बैलाचा घेवाण देवाणचा व्यवहार होता. त्यामुळे रणजित निंबाळकर हे काल दि. २७ रोजी रात्री निंबुत येथील गौतम काकडे यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी व्यवहारातून बाचाबाची होऊन झालेल्या भांडणातून गौतम काकडे यांचे भाऊ गौरव काकडे यांनी गोळीबार केला. यामध्ये निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी लागल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचरादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान रणजित निंबाळकर यांची पत्नी अंकिता निंबाळकर यांनी वडगाव निंबाळकर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. यावरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी गौतम शहाजीराव काकडे, गौरव शहाजीराव काकडे व इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.