मोठी बातमी! ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात आरोपींचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन

By नम्रता फडणीस | Published: November 20, 2023 08:00 PM2023-11-20T20:00:36+5:302023-11-20T20:01:25+5:30

ललित पाटील प्रकरणात ३ पानांचा गोपनीय अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला असून, या आरोपींचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचे तपासातून समोर

Big news International connection of accused in drug mafia Lalit Patil case | मोठी बातमी! ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात आरोपींचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन

मोठी बातमी! ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात आरोपींचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन

पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणातील आरोपींबाबत संवेदनशील माहिती असलेला तीन पानांचा गोपनीय अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला असून, या आरोपींचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असलेल्या काही गोष्टी तपासातून समोर आल्या असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात आणखी चार सदस्यांची नावे निष्पन्न झाल्यानंतर  त्यातील दोन आरोपी इमरान शेख उर्फ अतिक अमीर खान आणि हरिश्चंद्र पंत यांना पोलिसांनी अटक केली.  

यादोघांसह नऊ आरोपींची पोलीस कोठडी संपुष्टात आल्याने अकरा आरोपींना सोमवारी ( दि. २०) न्यायालयात हजर करण्यात आले. त्यात मुख्य आरोपी ललित पाटील, सुभाष मंडल, रौफ शेख, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, रेहान ऊर्फ गोलु अन्सारी, अरविंदकुमार लोहरे, प्रज्ञा कांबळे, जिशान शेख, शिवाजी शिंदे, राहुल पंडित यांचा समावेश आहे. .या प्रकरणात करण्यात आलेल्या तपासावरून या टोळीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मेफेड्रोन ड्रग्जची निर्मिती, ड्रग्जची साठवण, वितरण याबाबतची माहिती तपासात उघड झाली असून, त्यातील प्रत्येकाचा सहभाग उघड झाला आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, या साखळीचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी तपासी अधिकार्‍यांनी न्यायालयात केली. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील विलास पठारे यांनी बाजू मांडली. या आरोपींकडून मेफेड्रोनची बाजार भाव प्रमाणे किंमत दोन कोटी चौदा लाख तीस हजार सहाशे एवढी असून, या अमली पदार्थाच्या विक्रीतून आरोपींनी आठ किलो सोन्याची बिस्किटे चार चाकी गाड्या व महागडे मोबाईल हँडसेट असा एकूण 5 कोटी अकरा लाख 45 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज खरेदी केलेला आहे असे निष्पन्न झाले आहे.
     
दरम्यान, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, पोलीस कोठडीसाठी देण्यात आलेली कारणे ही मागील रिमांडमधीलच आहेत. याच मुद्यांवर गेल्यावेळी पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यामुळे आता पुन्हा पोलीस कोठडीची गरज नसल्याने त्यांना न्यायालयीन कोठडी द्यावी, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत ललित पाटील, अरविंद लोहरे, भूषण पाटील, जिशान शेख, राहुल पंडीत ऊर्फ रोहित कुमार, इम्रान शेख, शिवाजी शिंदे, हरिश पंत यांच्या पोलीस कोठडीत २४ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्याचा आदेश विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी दिला. तर, सुभाष मंडल, रौफ शेख, अभिषेक बलकवडे, रेहान ऊर्फ गोलू अन्सारी, प्रज्ञा कांबळे या पाच जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

Web Title: Big news International connection of accused in drug mafia Lalit Patil case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.