मोठी बातमी : उष्णतेच्या लाटेनंतर विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा हवामान विभागाने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 08:40 PM2021-04-07T20:40:31+5:302021-04-07T20:40:41+5:30

९ एप्रिलपासून तीन दिवस विजांच्या कडकडाटाची शक्यता

Big News: Meteorological department warns of heavy rains in Vidarbha, Marathwada after heat wave | मोठी बातमी : उष्णतेच्या लाटेनंतर विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा हवामान विभागाने दिला इशारा

मोठी बातमी : उष्णतेच्या लाटेनंतर विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा हवामान विभागाने दिला इशारा

Next

पुणे : विदर्भातील बहुतांशी भाग सध्या उष्णतेची लाट सहन करीत असतानाच हवामान विभागाने येत्या शुक्रवारपासून विदर्भासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात बुधवारी सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४२.९ अंश सेल्सिअस तसेच सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे १९.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. 

विदर्भाच्या तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. कोकण, गोव्याच्या बर्‍याच भागात, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. 

विदर्भात उष्णतेच्या लाटेनंतर ९ एप्रिलपासून पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. 
कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ९ ते ११ एप्रिल दरम्यान वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता आहे. सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी १० व ११ एप्रिल रोजी पावसाची शक्यता आहे. 

नांदेड जिल्ह्यात ९ ते ११ एप्रिल तसेच हिंगोली, परभणी जिल्ह्यात १० व ११ एप्रिल आणि बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. 

विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यात ९ ते ११ एप्रिल दरम्यान तीन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच यवतमाळ, अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी १० व ११ एप्रिल रोजी आणि अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ११ एप्रिल रोजी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 
पुणे व परिसरात ९ ते ११ एप्रिल दरम्यान आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Big News: Meteorological department warns of heavy rains in Vidarbha, Marathwada after heat wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.