मोठी बातमी! आगामी २४ तासात मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 09:28 PM2021-05-20T21:28:33+5:302021-05-20T21:29:04+5:30
अंदमान समुद्रात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मॉन्सूनच्या प्रगतीच्या दृष्टीने अनुकुल वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे : मॉन्सूनचे वारे भारतीय उपखंडाच्या दिशेने वेगाने येत असून आगामी २४ तासात मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र आणि त्याच्या लगतच्या दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात दाखल होण्याची शक्यता आहे.याचवेळी उत्तर अंदमान समुद्रा आणि लगतच्या पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात २२ मेपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचे २४ मे रोजी चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने हा अंदाज वर्तविला आहे.
अंदमान समुद्रात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मॉन्सूनच्या प्रगतीच्या दृष्टीने अनुकुल वातावरण निर्माण झाले आहे.
उत्तर अंदमान समुद्र आणि लगतच्या पूर्वमध्ये बंगालच्या उपसागरात येत्या २२ मेपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याचे संकेत असून या कमी दाबाच्या क्षेत्राचे २४ मे रोजी चक्रीवादळात रुपांतर होईल. त्यानंतर ते २६ मे रोजी सकाळी ओडिशा व पश्चिम बंगाल दरम्यान किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे.
नैऋत्य उत्तर प्रदेश ते मध्य पूर्व अरबी समुद्रापर्यंत पश्चिम मध्य प्रदेश, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण मार्गे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस कोकण व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेल्या २४ तासात गुरुवारी सकाळपर्यंत मुंबई २८.२, नागपूर ३.२, पुणे ७.८, नाशिक १, कोल्हापूर ०.७, रत्नागिरी ९.६, सातारा १.६, पणजी ५५.९ मिमी पावसाची नोंद झाली होती.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात शुक्रवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २१ मे तसेच २३ व २४ मे रोजी वादळी वार्यासह पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात २३ व २४ मे रोजी मेघगर्जना व विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २४ मे रोजी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.