मोठी बातमी :सैन्यदल भरती पेपर फोडण्यात अधिकारी, कर्मचार्यांचा हात; पुणे पोलिसांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 06:32 PM2021-03-02T18:32:47+5:302021-03-02T18:38:15+5:30
६० परीक्षार्थींना देणार होते प्रश्नपत्रिका
पुणे : भारतातील ४० केंद्रांवर होणार्या सैन्य दलातील शिपाई भरती परिक्षेचा पेपर फोडण्यामध्ये लष्करातून नुकतेच निवृत्त झालेले अधिकारी, भरतीसाठी क्लास चालविणारे चालक तसेच सध्या कार्यरत असलेल्या कर्मचार्यांचा हात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणात आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून हस्त केलेली प्रश्न पत्रिका मूळ प्रश्नपत्रिकेशी १०० टक्के जुळत असल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिमाभ गुप्ता यांनी दिली.
किशोर महादेव गिरी (वय ४०, रा. माळेगाव, बारामती), माधव शेषा्राव गित्ते (वय ३८, रा. सॅपर्स विहार कॉलनी), तसेच गोपाळ युवराज कोळी (वय ३१, रा. बी. ई. जी. सेंटर, दिघी) उदय दत्तु आवटी (वय २३, रा. बी. ई.जी. खडकी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. किशोर गिरी हा सैन्य भरती संबंधी क्लास चालवितो़ तर, माधव गित्ते हा जानेवारी अखेर लष्करातून हवालदार पदावरुन निवृत्त झाला आहे. गोपाळ कोळी हा ट्रेनिंग बटालियन २ मध्ये कवायत प्रशिक्षक आहे. उदय आवटी हा रेजिमेंटल पोलीस म्हणून लष्करात कार्यरत आहे. याप्रकरणात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
२८ फेब्रुवारी रोजी ट्रेनिंग बटालियन २ येथे व भारतातील ४० केंद्रांवर रिलेशन आर्मी शिपाई भरतीची लेखी परिक्षा होती. त्यात देशभरात लष्करातील नातेवाईकांचे ३० हजार परीक्षार्थी परिक्षा देणार होते. या परिक्षेची प्रश्न पत्रिका काही जण व्हॉटसअॅप वरुन वेगवेगळ्या खासगी सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र प्रमुखांना भरघोस रक्कमेला विकणार असल्याची माहिती सदर्न कमांड मिलिटरी इंटेलिजन्सच्या लायझन युनिटला मिळाली होती. ही माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना कळविली होती. सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख व खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील व त्यांच्या सहकार्यांनी बारामती येथे छापा मारुन किशोर गिरी व माधव गित्ते यांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या तपासात माधव गित्ते याच्याकडे फोडलेली प्रश्नपत्रिका परिक्षेच्या आदल्या रात्री आली होती. त्याने १४ परीक्षार्थींना देण्यासाठी विश्रांतवाडी येथील समृद्धी हॉटेल येथे एकत्र केले होते. त्याच्याकडून मिळालेल्या माहिती नुसार योगेश ऊर्फ गोट्या शंकर गोसावी (रा. माळेगाव, बारामती), कुमार परदेशी (रा. फलटण, जि़ सातारा) आणि भरत (रा. जळगाव) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचवेळी आणखी एक टोळी पेपर फोडणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अली अख्तरखान (वय ४७, रा. गणेशनगर, बोपखेल), आजाद लालमहंमद खान (वय ३७, रा. गणेशनगर, बोपखेल, दोघे मुळ रा. गाझीपूर, उत्तर प्रदेश), महेंद्र चंद्रभान सोनवणे (वय ३७, रा. आशाधन सोसायटी, दिघी) या तिघांना अटक करण्यात आली आहे. हे प्रत्येक परिक्षार्थीकडून १ लाख रुपये घेऊन पेपर आणून देणार असल्याची माहिती दिली. त्यांना दिघी येथील साईबाबा मंदिर येथे सापळा रचून पकडण्यात आले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल, सहायक निरीक्षक संदीप जमदाडे, उपनिरीक्षक जयदीप पाटील, दीपक माने, शशिकांत शिंदे, सहायक फौजदार महेंद्र पवार, हवालदार सचिन ढवळे, गणेश साळुंखे, नाईक, प्रविण भालचिम, सुरेंद्र साबळे, हवालदार शितल शिंदे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल शिंदे, सहायक निरीक्षक संदीप बुवा, शिरीष भालेराव, उपनिरीखक सोमनाथ शेंडगे, सहायक फौजदार पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, हवालदार प्रवीण रजपूत, मधुकर तुपसौंदर, नितीन कांबळे, अश्विनी केकाण, राजेंद्र लांडगे, गजानन सोनवलकर, अतुल साठे, प्रफुल्ल चव्हाण, हनुमंत कांदे, पिराजी बेले यांनी केली.
......
लष्करातील अधिकार्यांचा हात असल्याची शक्यता
अत्यंत गोपनीय पद्धतीने ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये प्रत्यक्ष पुरावा हा व्हॉटसअॅपवर आलेले पेपर होते. आरोपींना थोडी जरी शंका आली असती तर ते पुरावा नष्ट करु शकले असते. आरोपी हे लष्करातून निवृत्त झालेले, सध्या कार्यरत असलेले तसेच भरतीचे क्लास चालविणारे आहेत. त्यांच्यापर्यत मुळ प्रश्न पत्रिका कशी आली. यात निश्चितच सध्या कार्यरत असलेल्यांचा हात असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे व याची पाळेमुळे आणखी खोल असल्याची शक्यता असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी यांनी सांगितले.
वेगवेगळ्या शहरातील परीक्षार्थींशी संपर्कात त्यांनी सुमारे ६० परीक्षार्थीशी संपर्क साधला होता. त्यातील अनेक जण सातारा, जळगाव, नाशिक, मराठवाडा येथील होते. त्यांच्याकडून ते अगोदर १ लाख व भरती झाल्यानंतर एक लाख रुपये घेणार होते.