मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द; मुसळधार पावसामुळे निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 10:45 AM2024-09-26T10:45:09+5:302024-09-26T10:46:37+5:30

पुणे शहर आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.

Big news PM Narendra Modi Pune visit cancelled Decision due to heavy rain | मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द; मुसळधार पावसामुळे निर्णय!

मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द; मुसळधार पावसामुळे निर्णय!

Narendra Modi Pune Visit ( Marathi News ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज होणारा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून पुण्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर आज शहरातील विविध विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमांसाठी पुणे दौऱ्यावर येणाऱ्या मोदींनी आपला दौरा रद्द केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मेट्रोच्या स्वारगेट ते मंडई या भुयारी मार्गाचे लोकार्पण होणार होते. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार होती. तसंच ते भिडेवाडा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणी करणार होते. मात्र पुणे शहर आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.

कसा होता पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा?

पंतप्रधान दुपारी ४ वाजता विमानतळावरून शिवाजीनगर मेट्रो स्थानकात येणार होते. तिथून ते मेट्रोने स्वारगेटला जाणार होते. स्वारगेटवरून गाडीने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आल्यानंतर त्यांची जाहीर सभा होणार होती. मेट्रोसह एकूण १२ प्रकल्पांचे त्यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन होणार होते. स्वारगेट ते कात्रज या विस्तारीत भुयारी मेट्रो मार्गाच्या कामाचाही समावेश होता. सभेनंतर फर्ग्यूसन महाविद्यालय परिसरात त्यांच्या रोड शोचेही आयोजन करण्यात आले होते. 
 
पुण्यात पावसाचा धुमाकूळ

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झालं आहे. बुधवारी पुणे, मुंबईसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात झालेल्या अतिवृष्टीने अक्षरशा झोडपून काढले. त्यामुळे सखल भागात पाणी साचल्याने दाणादाण उडाली. भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबई यांनी आजही वादळ व विजेच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिपरी-चिंचवड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना आज सुटी देण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.

Web Title: Big news PM Narendra Modi Pune visit cancelled Decision due to heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.