मोठी बातमी..! स्वारगेट प्रकरणातील फरार आरोपी दत्ता गाडेसाठी पोलिसांचे १ लाखांचे बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 09:38 IST2025-02-27T09:37:05+5:302025-02-27T09:38:15+5:30

पुणे पोलिसांनी आरोपी दत्ता गाडे याला अटक करण्यासाठी नागरिकांची मदत मागितली आहे.

Big news! Police offer Rs 1 lakh reward for absconding accused Datta Gade in Swargate case | मोठी बातमी..! स्वारगेट प्रकरणातील फरार आरोपी दत्ता गाडेसाठी पोलिसांचे १ लाखांचे बक्षीस

मोठी बातमी..! स्वारगेट प्रकरणातील फरार आरोपी दत्ता गाडेसाठी पोलिसांचे १ लाखांचे बक्षीस

- किरण शिंदे

पुणे :
स्वारगेट एसटी स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार मंगळवारी (२७ फेब्रुवारी) सकाळी घडला. आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३६, रा. शिक्रापूर) याने पीडित तरुणीला धमकावून तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर पसार झाला.  

या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरीसह सात गुन्हे दाखल आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पुणेपोलिसांनी आठ पथके तयार केली असून, त्याच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणावर तपास सुरू आहे.  

आरोपीस पकडणाऱ्यास १ लाखाचे बक्षीस

पुणे पोलिसांनी आरोपी दत्ता गाडे याला अटक करण्यासाठी नागरिकांची मदत मागितली आहे. आरोपीबद्दल माहिती देणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  



पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकण्यात येत असून, लवकरच त्याला अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.नागरिकांनी कुठल्याही संशयित हालचाली आढळल्यास स्वारगेट पोलीस ठाण्याशी किंवा १०० क्रमांकावर संपर्क साधावा. अशा सूचनाही देण्यात आली आहे. 

नेमकं काय घडलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी सकाळी साडेपाचच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकात आली. ती फलटणला निघाली होती. ती बसची वाट पाहात थांबली असताना गाडेने तिला हेरले. त्याने ताई फलटणची बस येथे लागत नाही, पलीकडे लागते, असे तिला सांगितले. मात्र, पीडितेने मी नेहमीच येथून बसते असे म्हणत पलीकडे जाण्यास नकार दिला. त्यावर त्याने मी इथे गेली दहा वर्षे काम करत आहे, असे सांगून तिचा विश्वास संपादन केला. यानंतर तिला स्वारगेट - सोलापूर शिवशाही बसजवळ नेले. तेथे गेल्यावर तिने बसमध्ये अंधार दिसत असल्याचे सांगितले. यावर गाडेने रात्रीची बस असल्याने प्रवासी लाइट बंद करून झोपले असल्याचे सांगितले. पाहिजे तर मोबाइलची लाइट लावून बघून ये, असे तो म्हणाला. त्याच्यावर विश्वास ठेवत तरुणी बसमध्ये चढली.

ही संधी साधत गाडेने मागोमाग येत तिचा गळा आवळला. यानंतर तिला ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केला. या घटनेने तरुणीला मोठा धक्का बसला होता. तिने खाली आल्यावर एक प्रवाशाला गाडेने केलेल्या कृत्याबद्दल माहिती दिली. मात्र, त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर तरुणी काही वेळाने आलेल्या फलटणच्या बसमध्ये बसून निघून गेली.

दरम्यान, प्रवासात अस्वस्थ वाटत असतानाच तिने मित्राला फोन करून घटना सांगितली. मित्राने धीर दिल्यावर ती सातारा येथून पुन्हा माघारी फिरून स्वारगेटला आली. तेथे येऊन सकाळी नऊच्या सुमारास तिने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित तरुणीची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. सध्या पीडित तरुणी ससून रुग्णालयात ॲडमिट असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गाडेच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

उद्धवसेनेकडून स्वारगेट बसस्थानकावर तोडफोड

स्वारगेट बसस्थानकावर मंगळवारी पहाटे झालेल्या बलात्कार प्रकरणावरून स्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत राजकीय पक्ष आक्रमक झाले. उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बसस्थानकात जाऊन तोडफोड केली. प्रशासन तसेच सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. वसंत मोरे यांच्यासह उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केबिन, बसची तोडफोड केली.

चाकणकर, गोऱ्हे यांची भेट

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी दुपारी स्थानकाला भेट दिली. त्यांच्यासमवेत शिंदेसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे, अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी होते. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणावरून पोलिस आयुक्तांकडे चौकशी केली. संबंधित पोलिस ठाण्यातही त्यांनी संपर्क साधला. संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल देण्याबाबत त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सांगितले. त्याचबरोबर स्थानकात वावरताना महिला, मुलींनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, त्यांनी काहीही सांगितले तरी त्यांचे ऐकू नये, कोणतीही समस्या असेल तर स्थानक प्रमुख किंवा एसटीचे जे अधिकारी उपस्थित असतील त्यांच्याशीच थेट संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. माजी नगरसेविका ॲड. रुपाली पाटील-ठोंबरे यांनीही बसस्थानकाला भेट दिली. येथील कायदा व सुव्यवस्थेबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

सुप्रिया सुळेंचा सवाल

खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी याबाबत एक्सवर सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चिंताजनक झाल्याचे म्हटले आहे. गुन्हेगारांना राज्यात कायद्याचा धाक उरलेला नाही. आधी काही गुन्हे दाखल असलेली व्यक्ती एखाद्या स्थानकात अशी मोकाट कशी फिरू शकते, असा प्रश्न खासदार सुळे यांनी उपस्थित केला.

Web Title: Big news! Police offer Rs 1 lakh reward for absconding accused Datta Gade in Swargate case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.