मोठी बातमी: पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर जप्त केले कोट्यवधींचे चंदन; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई
By नारायण बडगुजर | Updated: March 2, 2025 21:37 IST2025-03-02T21:36:39+5:302025-03-02T21:37:33+5:30
तस्करीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश.

मोठी बातमी: पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर जप्त केले कोट्यवधींचे चंदन; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई
नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने कोट्यवधी रुपयांचे चंदन जप्त केले. यातून तस्करीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर रविवारी ही कारवाई केली. या प्रकरणात पोलिसांनी वाहनचालकासह संशयितांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरू येथून पुणे मार्गे मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर चंदनाची तस्करी होत असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला मिळाली. गुप्त खबऱ्याकडून मिळालेल्या या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सापळा रचला. संशयास्पद कंटेनर दिसताच पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली. सुरुवातीला वाहनचालक आणि तस्करांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र कंटेनर उघडून पाहताच कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणावर चंदन आढळले.
पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला आणि त्यातील चंदनाचा साठा जप्त केला. कंटेनरमधून जप्त केलेले हे चंदन १० ते १५ टन असून या कारवाईमुळे आंतरराज्यीय तस्करांचे जाळे उघडकीस आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार जप्त केलेल्या चंदनाची किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत असू शकते. तस्करी करून आंतरराष्ट्रीय बाजारात चंदनाची विक्री करण्याचा डाव होता, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. तस्करीमध्ये मोठे माफिया गट सामील असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.