पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 10:08 AM2024-05-25T10:08:54+5:302024-05-25T10:20:28+5:30
Pune Porsche Accident Latest Update: बिल्डर विशाल अग्रवाल याने सर्वात आधी अपघात झाला तेव्हा ड्रायव्हर गाडी चालवत होता, असा दावा केला होता. प्रतापी बाळाला सोडविण्यासाठी या अग्रवालांनी भरपूर प्रयत्न केले.
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. छोटा राजनशी संबंध असलेल्या आजोबाला पुणेपोलिसांनी अटक केली आहे. या आजोबाने लाडक्या नातवाच्या पोर्शे कारवर ड्रायव्हर असलेल्या साक्षीदाराला डांबून ठेवले होते. तसेच त्याला धमक्याही दिल्या होत्या. या प्रकरणात आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे.
बिल्डर विशाल अग्रवाल याने सर्वात आधी अपघात झाला तेव्हा ड्रायव्हर गाडी चालवत होता, असा दावा केला होता. प्रतापी बाळाला सोडविण्यासाठी या अग्रवालांनी भरपूर प्रयत्न केले. सुरुवातीला पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दिमतीला आणले, एफआयआरमध्ये साधी कलमे लावायला लावली, बाळाने दारु पिली हे न समजण्यासाठी उशिराने टेस्ट करायला लावणे आदी गोष्टी पोलिसांना हाताशी धरून करण्यात आली होती. या प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आता या प्रकरणी मोठी अपडेट आली आहे.
बाळाला वाचविण्यासाठी आजोबानेही भरपूर प्रयत्न केल्याचे समोर येत आहे. त्याला सोडविण्यासाठी ड्रायव्हरला अडकविण्याचे पुरेपूर प्रयत्न करण्यात आले. बापानंतर बाळानेही मी नाही तर ड्रायव्हर कार चालवत होता असा दावा केला होता. गुन्हा आपल्या माथ्यावर घेण्यासाठी ड्रायव्हरला गुन्हेगारीचे आरोप असलेल्या आजोबा सुरेंद्र यांनी डांबून ठेवले होते असे तपासात समोर आले आहे. यावेळी ड्रायव्हरला गुन्हा कबूल करण्यासाठी दबाव टाकून धमक्याही देण्यात आल्या आहेत.
गंगाराम पुजारी या ड्रायव्हरला सुरेंद्रने दोन दिवस डांबून ठेवले होते. त्याला योग्य जबाब नोंदवायला दिला नाही, तसेच धमक्या दिल्याचे आरोप सुरेद्रवर करण्यात आले आहेत. आजोबा सुरेंद्रला आज दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. तसेच बिल्डर विशाल अग्रवालचा देखील पोलीस ताबा घेणार आहेत.
काल काय घडले...
येरवडा पोलिसांकडून निष्काळजीपणा झाल्याची कबुली स्वत: पोलिस आयुक्तांनीच दिली. अपघातानंतर अग्रवाल कुटुंबीयांकडून बाळाच्या ऐवजी ड्रायव्हरच पोर्शे कार चालवत असल्याचा बनाव केला गेला, मात्र ते बाळच गाडी चालवत असल्याचे भक्कम पुरावे आमच्याकडे आहेत, असे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी अशी निलंबित करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. अपघात झाला त्या रात्री हे दोघे त्या ठिकाणी ड्यूटीवर तैनात होते. अपघात झाल्यानंतर त्यांनी कंट्रोल रूमशी संपर्क केला नाही, तसेच नाईट राऊंडवर असलेल्या पोलिस उपायुक्तांनाही याची माहिती दिली नाही. त्यांनी ही माहिती का लपवून ठेवली, त्यांचा हेतू नेमका काय होता, याचीही चौकशी करण्यात येणार आहे.