मोठी बातमी: पुणे पोलिसांचा कठोर निर्णय; दारू पिऊन वाहन चालवल्यास लायसन्स थेट रद्द होणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 01:34 PM2024-07-10T13:34:25+5:302024-07-10T13:35:39+5:30
पुणे पोलिसांनी कठोर निर्णय घेत दारू पिऊन वाहन चालवल्यास लायसन्स रद्द केलं जाणार असल्याचं म्हटलं आहे.
Pune Police ( Marathi News ) : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत असताना ड्रिंक अँड ड्राइव्हच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पुण्यात झालेल्या पोर्श कार अपघात प्रकरणाची तर राज्यभर मोठी चर्चा झाली. या प्रकरणानंतरही अशाच काही घटना समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता पुणेपोलिसांनी कठोर निर्णय घेत दारू पिऊन वाहन चालवल्यास लायसन्स रद्द केलं जाणार असल्याचं म्हटलं आहे.
पुणे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं आहे की, एखादा चालक दारू पिऊन वाहन चालवत असल्यास पहिल्यांदा त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द केले जाईल. या गुन्ह्यात तो दुसऱ्यांदा सापडल्यास लायसन्स सहा महिन्यांसाठी रद्द केले जाईल. मात्र त्याने तिसऱ्यांदा हा गुन्हा केल्यास त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल.
दरम्यान, याआधी ड्रिंक अँड ड्राइव्हच्या प्रकरणात पोलिसांकडून दंड आकारण्यात येत होता. मात्र या घटना वाढीस लागून अनेक नागरिकांचा हकनाक बळी जाऊ लागल्याने पोलिसांनी कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दारू पिऊन वाहन चालवणं चालकांना चांगलंच महागात पडणार आहे.
पोलीस कर्मचाऱ्यालाच चिरडलं!
हिड अँड रनच्या प्रकरणांमध्ये पुणे शहरात संताप व्यक्त केला जात असताना सोमवारी एक भीषण घटना समोर आली. खडकी पोलिस ठाण्याचे, खडकी बाजार परिसरातील बीट मार्शल कर्मचारी संजोग शिंदे आणि पोलिस हवालदार कोळी यांना सोमवारी मध्यरात्री एक वाजून ४० मिनिटांनी सुमारास अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली. हा अपघात खडकी अंडरपास, हॅरिस ब्रिज जवळ घडला. त्यात पोलिस हवालदार कोळी यांचा जागीच मृत्यू झाला तर संजोग शिंदे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.