भारतीय कंपन्याना ब्रिटनमध्ये गुंतवणुकीसाठी मोठी संधी- लॉर्ड डॉमिनिक जॉन्सन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 10:46 AM2023-04-29T10:46:48+5:302023-04-29T10:48:41+5:30
पुण्यात ब्रिटिश व्यापार केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते...
पुणे : भारतातील ई-स्कूटरपासून जैवशास्त्र ते कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या भारतीय कंपन्यांना ब्रिटनमध्ये गुंतवणुकीसाठी मोठी संधी आहे, असे प्रतिपादन ब्रिटनचे उद्योग व व्यापार राज्यमंत्री लॉर्ड डॉमिनिक जॉन्सन यांनी केले. यावेळी त्यांनी ‘पुण्यात येऊन मला खूप आनंद झाला’ अशा खास मराठी शैलीत पुणेकरांशी संवाद साधला.
पुण्यात ब्रिटिश व्यापार केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, ब्रिटनसाठी भारत ही एक प्राधान्यक्रम असलेली बाजारपेठ असून दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या व्यापार कराराच्या वाटाघाटींना गती मिळण्यास मदत होईल.
तत्पूर्वी, जॉन्सन यांनी ब्रिटनमध्ये गुंतवणूक केलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारत फोर्ज आणि झेन्सार यासारख्या कंपन्यांची तसेच व्यावसायिक समुदायांची भेट घेतली. ते म्हणाले, ‘या व्यापार केंद्रामुळे महाराष्ट्र तसेच भारतात सुरू असलेल्या गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. आम्ही भारतासोबत जेवढा अधिक व्यापार करू शकतो, तितके चांगले. दोन्ही देशांना एक समंजस व्यापार निर्माण करायचा आहे. वाटाघाटी करण्यास वेळ लागतो; परंतु भारतीय कंपन्यांचा ब्रिटनमध्ये गुंतवणुकीसाठीचा आशावाद उत्साहवर्धक आहे. त्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत तसेच ब्रिटनमधील वित्तीय सेवा संस्थांना भारतात गुंतवणुकीसाठी मोठी संधी आहे.
भारत हा देश आर्थिकदृष्ट्या दशकातील मोठ्या प्रगतीच्या मार्गावर आहे. मात्र, त्यासाठी लागणारे भांडवल अतिशय महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. त्याच वेळी, भारतही ब्रिटनमधील काही प्रगत उत्पादन आणि आयटी सेवांमध्ये गुंतवणूक करू शकेल.