भोसरी पोलिसांची मोठी कामगिरी: भेसळयुक्त डिझेल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 09:12 PM2021-04-06T21:12:45+5:302021-04-06T21:13:19+5:30

सहा आरोपींना अटक करून ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Big performance of Bhosari police: Arrested of gang who selling adulterated diesel | भोसरी पोलिसांची मोठी कामगिरी: भेसळयुक्त डिझेल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

भोसरी पोलिसांची मोठी कामगिरी: भेसळयुक्त डिझेल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

googlenewsNext

पिंपरी : भेसळयुक्त डिझेल विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. भेसळयुक्त डीझेलचा पुरवठादार, डीझेल विक्री करणारा डीलर, दोन सब डीलर आणि दोन ग्राहक अशा सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन टँकर, एक चारचाकी वाहन, असा एकूण ३७ लाख १५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भोसरी पोलिसांनी ही कारवाई केली.

पुरवठादार कैलाश पंजाबी, डीलर सुधीर बागलाने, सबडीलर ऋषिकेश सतीश कदम, रोहन शशिकांत हडपे, ग्राहक शहनवाज नजीर बेग, शौकत नजीर बेग, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील लांडगे नाट्यगृहाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात भेसळयुक्त डीझेलची विक्री होत आहे, अशी माहिती मिळाली.

त्यानुसार भोसरी पोलिसांनी २ एप्रिलला रात्री साडेआठच्या सुमारास सापळा रचून कारवाई केली. पोलिसांनी एक चारचाकी वाहन, दोन आयबीसी टंक, ऑईल विक्रीचे रीडिंग दाखवणारी मशीन, डीझेल मोजण्याचे साधन, असा एकूण सात लाख ७५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात पोलिसांनी आरोपी ऋषिकेश आणि रोहन यांना अटक केली.

भेसळयुक्त डीझेल सुधीर बागलाने याच्याकडून आणले आहे, असे अटक केलेल्या आरोपींनी माहिती दिली. तसेच बागलाने याने केलेला डीझेलचा साठाही आरोपींनी पोलिसांना दाखवला. त्यानुसार पोलिसांनी बागलाने याला अटक करून त्याच्याकडून दोन टँकर, २० हजार लिटर भेसळयुक्त डीझेल, असा २९ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. बागलाने याला भेसळयुक्त डीझेलचा पुरवठा करणारा मुख्य डीलर कैलाश पंजाबी, तसेच दोन ग्राहकांना अटक करण्यात आली. 

भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर आवताडे, निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, विनायक म्हसकर, अनिकेत पाटोळे, सुमीत देवकर, समीर रासकर, गणेश सावंत, विनोद वीर, संतोष महाडिक, मार्तंड बांगर यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

बायो डिझेल म्हणून विक्री
पेट्रोल व डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र आरोपी हे भेसळयुक्त डिझेल प्रतिलिटर ७२ रुपये दराने विक्री करीत होते. त्यामुळे काही ग्राहकांकडून याबाबत त्यांच्याकडे विचारणा होत असे. एवढे स्वस्त डिझेल कसे विकता, असे प्रश्न ग्राहक करीत असत. आम्ही बायो डिझेल विकत असून, ते स्वस्तात मिळते, असे आरोपी संबंधित ग्राहकांना सांगत होते.

रॅकेट तीन महिन्यांपासून सक्रीय
शहरात भेसळयुक्त डिझेल विक्री होत असल्याचे समोर आले आहे. त्याचे रॅकेट तीन महिन्यांपासून सक्रीय होते. यातील आरोपींकडून भेसळयुक्त डिझेल जप्त केले असून, आणखी मोठा साठा त्यांच्याकडून मिळण्याची शक्यता पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केली आहे. त्याअनुषंगाने पोलीस आरोपींकडे कसून चौकशी करीत आहेत.

मोठ्या वाहनतळांवर विक्री 
प्लास्टिकच्या टँकमध्ये दररोज एक हजार लिटर भेसळयुक्त डिझेल भरून ते चारचाकी वाहनातून विक्रीसाठी घेऊन जात होते. मोठ्या प्रमाणात वाहने पार्क होत असलेल्या ठिकाणी ते डिझेल प्रतिलिटर ७२ रुपये दराने विक्री करीत होते. खासगी ट्रॅव्हल्स बसचे पार्किंग, अवजड वाहनांचे पार्किंग, तसेच जेथे वाहने मोठ्या प्रमाणात थांबतात, अशी ठिकाणे निवडून तेथे भेसळयुक्त डिझेलची विक्री होत असे.

Web Title: Big performance of Bhosari police: Arrested of gang who selling adulterated diesel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.