दिव्यांगांना मोठा दिलासा, महापालिकेच्या मुख्य इमारतीत बांधला रॅम्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:54 AM2017-12-27T00:54:23+5:302017-12-27T00:54:33+5:30
पुणे : महापालिकेने ‘लोकमत’ मधील वृत्ताची तत्परतेने दखल घेत मुख्य इमारतीच्या डाव्या बाजूच्या प्रवेशद्वाराजवळ दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प (दिव्यांगांचे वाहन प्रवेशद्वारातून नेता येईल, अशी व्यवस्था) बांधला.
पुणे : महापालिकेने ‘लोकमत’ मधील वृत्ताची तत्परतेने दखल घेत मुख्य इमारतीच्या डाव्या बाजूच्या प्रवेशद्वाराजवळ दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प (दिव्यांगांचे वाहन प्रवेशद्वारातून नेता येईल, अशी व्यवस्था) बांधला. ‘वरं जमहितं ध्येयं’ असे बोधवाक्य असलेल्या या इमारतीत दिव्यांग व्यक्तींच्या या सुविधेकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले होते.
‘लोकमत’ने नेमका या वस्तुस्थितीवर प्रकाश टाकला होता. त्याची आयुक्त कुणाल कुमार यांनी तातडीने दखल घेतली व संबंधितांना असा रॅम्प बांधण्याविषयीचा आदेश दिला. प्रशासनाने त्याची त्वरित अंमलबजावणी केली.
मात्र, हा रॅम्प लाकडी खांब व फळ्यांनी बांधला आहे. तो तात्पुरता बांधला असल्याची माहिती मिळाली. मंडपाला बांधतात, तसे कापड
त्याला बांधण्यात आले असून चालण्याच्या ठिकाणी रेड कार्पेट टाकण्यात आले आहे.
कोणत्याही सरकारी इमारतीत व अथवा शाळा, रुग्णालयांमध्ये दिव्यांगाना तिथे प्रवेश करता यावा यासाठी असा रॅम्प बांधला जावा, असा सरकारचा आदेश आहे.
बहुतेक ठिकाणी त्याची अंमलबजावणी केली गेली आहे. महापालिकेतही ती केली आहे, मात्र प्रशासकीय इमारत असलेल्या ठिकाणी ही व्यवस्था नव्हती. पदाधिकारी बसतात त्या इमारतीत अशी व्यवस्था आहे.
>नव्या इमारतीच्या बांधकामामुळे तात्पुरता रॅम्प
‘लोकमत’मध्ये त्यासंबधी वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळे त्याची दखल घेत आता हा रॅम्प बांधण्यात आले आहे. त्याला रंगीबेरंगी कापड बांधल्यामुळे व रेड कार्पेट टाकल्याने महापालिकेत कोणी परदेशी पाहुणे येणार आहेत किंवा काय, या विषयी मंगळवारी महापालिकेत चर्चा सुरू होती. भवन रचनाचे अधीक्षक अभियंता शिवाजी लंके यांनी सांगितले, की हा रॅम्प तात्पुरता बांधला आहे. या इमारतीला दुसºया बाजूने असा रॅम्प आहे, पण तिथे नव्या इमारतीचे काम सुरू असल्यामुळे तो तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे.