महापालिकेच्या बाक खरेदीमध्ये मोठा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 09:54 PM2018-05-18T21:54:21+5:302018-05-18T21:54:21+5:30

ठेकेदाराने १० हजार ९०० रुपयांचे बाक म्हणून पुरवठा केलेले बाक चायनिज बनावटीचे असून त्याची बाजारातील किंमत केवळ ४ हजार ५०० रुपयेच असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Big scam in municipal bench purchases | महापालिकेच्या बाक खरेदीमध्ये मोठा घोटाळा

महापालिकेच्या बाक खरेदीमध्ये मोठा घोटाळा

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात सर्वत्र चायनिज बनावटीच्या बाकांचा पुरवठा चौकशी करून संबंधित ठेकेदारावर व त्यांना पाठींशी घालणा-या अधिका-यावर कारवाई करण्याची मागणी

पुणे : शहरामध्ये महापालिकेच्या वतीने सोसायट्या, चौक, ज्येष्ठ नागरिक कट्टा, उद्याने येथे नागरिकांना बसण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात बाक खरेदी केले जातात. बाकांची खरेदी करताना बाजारातील मूळ किमतीपेक्षा वाढीव किंमत मोजण्यात आल्याचे समोर येत आहे. महापालिकेच्या वतीने एका बाकची किंमत १० हजार ९०० रुपये इतकी ठरवली असताना प्रत्यक्षात ठेकेदाराकडून चायनिज बनावटीचे चार हजार रुपयांचे बाकचा पुरवठा करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार सुरु असल्याचा आरोप स्थायी समितीचे सदस्य उमेश गायकवाड यांनी केला आहे. 
    शहरातील विविध सोसायट्या, चौक, महापालिकेची उद्याने, ज्येष्ठ नागरिक कट्टा, सार्वजनिक वाचनालये आदी विविध ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या वतीने बाक बसविण्यात येतात. यासाठी निविदा काढून ठेकेदारामार्फत संपूर्ण शहरामध्ये या बाकांचा पुरवठा करण्यात येतो. तीन वर्षांपूर्वी ठेकेदाराला एका बाकाची तेरा हजार इतकी दिली जात होती. यावरून बरेच आरोप झाल्यानंतर ती बदलून दहा हजार नऊशे इतकी ठरली होती. त्यानंतर सुद्धा किंमत किती वाढवून लावलेली आहे हे आता समोर येत आहे. ही किंमत ठरवताना एका विशिष्ट कंपनीचा बाक असल्याचे सांगण्यात आले. परंतू, प्रत्यक्ष पुरवठा करताना दुस-याच कंपनीचे बाक पुरविण्यात आले. ठेकेदाराने १० हजार ९०० रुपयांचे बाक म्हणून पुरवठा केलेले बाक चायनिज बनावटीचे असून, त्याची बाजारातील किंमत केवळ ४ हजार ५०० रुपयेच असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. 
    याबाबत गायकवाड यांनी सांगितले की, कोरेगाव पार्क-घोरपडी या प्रभागत बाकचा पुरवठा केला जात असताना बाकांच्या दर्जाची तापसणी केली. याबाबत अधिक तपास केल्या असता संपूर्ण शहरामध्ये चायनिज बनावटीचे बाक पुरविण्यात आले असून, गेल्या तीन वर्षांपासून हा उद्योग सुरु असल्याचे समोर आले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची गेल्या तीन वर्षांपासूनच्या बाक खरेदीची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर व त्यांना पाठींशी घालणा-या अधिका-यावर कारवाई करण्याची मागणी गायकवाड यांनी केली.
--------------------
बाक खेरदीची व दराची माहिती मागवली
स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य उमेश गायकवाड यांनी शहरातील बाक खरेदीचा विषय उपस्थित केला. यामध्ये त्यांनी ठेकेदाराकडून पुरविण्यात येत असलेल्या बाकांची बाजारात किंमत केवळ साडे चार हजार असताना महापालिका तब्बल १० हजार ९०० रुपये देते असे सांगितले. या प्रकरणात संबंधित अधिका-यांना गेल्या तीन वर्षांतील बाक खरेदीची माहिती व ठेकेदाराला देण्यात आलेले दर मागविण्यात आले असून, पुढील आठवड्यात होणा-या बैठकीत सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
- योगेश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष

Web Title: Big scam in municipal bench purchases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.