राजगुरूनगर सहकारी बँकेत मोठा घोटाळा, रोखपालाचा ८१ लाखांचा अपहार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 10:26 PM2018-01-08T22:26:49+5:302018-01-08T22:27:02+5:30
राजगुरूनगर सहकारी बँकेच्या महाळुंगे इंगळे शाखेत रोखपालाने ८१ लाख ३४ हजार इतक्या बँकेच्या व खातेदारांच्या पैशांचा अपहार केला आहे
चाकण : राजगुरूनगर सहकारी बँकेच्या महाळुंगे इंगळे शाखेत रोखपालाने ८१ लाख ३४ हजार इतक्या बँकेच्या व खातेदारांच्या पैशांचा अपहार केला आहे. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेला अपहार उशिरा लक्षात आल्याने बँकेचे धाबे दणाणले असून, सभासदांमध्ये ठेवींबाबत घबराट निर्माण झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १५ जून २०१६ ते ५ जानेवारी २०१७ दरम्यान घडला. याप्रकरणी राजगुरूनगर सहकारी बँकेच्या महाळुंगे शाखेतील रोखपाल राहुल विलासचंद्र बोरा याच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील काळात रोखपाल ( कॅशिअर ) राहुल बोरा याने महाळुंगे शाखेत नोकरी करताना दैनंदिन कामकाजात ग्राहक सेवेसाठी दैनंदिन कामकाजासाठी स्ट्रॉंग रूममधून पैसे काढणे, एटीएममध्ये पैसे भरणे, त्याचा तपशील ठेवणे व दिवस अखेरीस शिल्लक रक्कम स्ट्रॉंग रूममध्ये जमा करणे अशा प्रकारचे काम करताना ८१ लाख ४१ हजार ९४३ रुपये ९६ पैसे इतक्या मोठ्या रकमेचा अपहार केला.
एटीएममध्ये पैसे भरल्यानंतर ४३ लाख ९५ हजार २०० इतकी रक्कम शिल्लक असणे आवश्यक असताना मोजणीनंतर ती रक्कम १ लाख ५९ हजार २०० रुपये इतकी आढळून आली. तसेच बँकेच्या कॅश कस्टडीमध्ये नाणेवारी प्रिंटनुसार ५१ लाख २१ हजार १०३ रुपये ९६ पैसे इतकी रक्कम भरणे आवश्यक होते. परंतु प्रत्यक्षात मोजणी करताना ही रक्कम १२ लाख १५ हजार १६० रुपये इतकी मिळून आली. या रोख रकमेचा बँकेची व जनतेच्या पैशाचा अपहार करून फसवणूक केली आहे. बँकेचे अधिकारी किशोर ज्ञानेश्वर आदक वय ५७, रा. राजगुरूनगर, जि. पुणे यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.