बारामती लोकसभा मदारसंघांत सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का; प्रविण मानेंचा महायुतीला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 01:35 PM2024-04-07T13:35:13+5:302024-04-07T15:58:06+5:30
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण माने व कुटुंबीयाची यांची भेट घेतल्यानंतर महायुतीसोबत जाण्याचा निर्णय
कळस : बारामती लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रविण माने यांनी अजित पवार गटाला पाठिंबा देऊन महायुती बरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माने यांच्याघरी चहापान करत टाकलेला डाव यशस्वी झाला आहे. यामुळे सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
पत्रकात परिषद घेत माने यांनी भूमिका स्पस्ट केली राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दोन गट पडले. नंतर माने यांनी शरद पवार यांना पाठिंबा व्यक्त केला होता. तसेच सुप्रिया सुळे यांच्या प्रचार यंत्रणेत सहभागी होत तालुक्याची धुरा हाती घेतली होती. सुळे यांची सर्व भिस्त माने यांच्यावर होती. मात्र शरद पवार यांच्या इंदापूर येथील जाहीर सभेला अनुपस्थित राहिल्याने अनेक चर्चाना उधाण आले होते. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण माने व कुटुंबीयाची यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते महायुतीसोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. निवडणुका तोंडावर असतानाच माने यांच्या महायुती पाठिंब्यामुळे सुप्रिया सुळेंना मोठा धक्का बसणार आहे. माने यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माने यांच्या पाठिंब्याने महायुतीच्या उमेदवार सूनेत्रा पवार यांना मोठा फायदा होणार आहे. माने यांचे इंदापूर तालुक्यासह जिल्ह्यात मोठे वलय आहे.
यावेळी बोलताना माने यांनी सांगितले, कि तालुक्यातील विकासकामांना गती देण्यासाठी आम्ही अजित पवार यांच्याबरोबर राहणार आहोत. बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीतील महायुतीचा उमेदवार निश्चित झाला नव्हता. त्यावेळी आपण सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत होतो. आठ दिवसांपूर्वी महायुतीमधून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अजित पवार यांचे हात बळकट करुन इंदापूर तालुक्याच्या विकास करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर माने परिवाराने अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.