मोठं यश! कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणी मुख्य आरोपीला यूएईमध्ये अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 02:28 PM2021-03-06T14:28:46+5:302021-03-06T14:29:40+5:30

भारतातील रुपे कार्डवरुन अडीच कोटी रुपये काढण्यात मुख्य सहभाग असलेल्या सुमेर शेखला अटक

Big success! Cosmos Bank cyber attack case main accused was arrested in UAE | मोठं यश! कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणी मुख्य आरोपीला यूएईमध्ये अटक

मोठं यश! कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणी मुख्य आरोपीला यूएईमध्ये अटक

googlenewsNext

पुणे : कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला करुन ९४ कोटी ४२ रुपये लुटणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळीतील भारतातील रुपे कार्डमार्फत झालेल्या अडीच कोटी रुपयांच्या फसवणूकीतील टोळी प्रमुखाला संयुक्त अरब अमिराती (युएई) पोलिसांनी अटक केली. सुमेर शेख (वय २८, सध्या रा. दुबई, मुळ रा. मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणात पुणेपोलिसांकडून आरोपीच्या प्रत्यार्पणासाठी केंद्रीय तपास संस्थेच्या माध्यमातून यूएई पोलिसांकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.

कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर हल्ला करुन जगभरातील २८ देशातून ९४ कोटी ४२ लाख रुपये काढण्यात आले होते. त्यासाठी परदेशात व्हिसा डेबिट कार्डचा वापर करण्यात आला होता. तर, भारतात रुपे कार्डचा वापर केला गेला होता.देशातील १७ शहरांमधील एटीएममधून अडीच कोटी रुपये काढण्यात आले होते. हे क्लोन केलेले रुपे कार्ड सुमेर शेख याने आपली पत्नी व नातेवाईकांमार्फत देशभरातील साथीदारांना पुरविले होते. पुणे पोलिसांनी सुमेर शेख याची पत्नी व इतर अशा १२ जणांना आतापर्यंत अटक केली आहे. 

काँसमॉस बँकेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला प्रकरणात सुमेर शेख याचा सहभाग होता. त्याने या गुन्ह्याचा कट रचल्याचे तसेच नियोजनबद्धरित्या बँकेच्या ग्राहकांची माहिती डार्क वेबवरुन विकत घेणे, बनावट डेबिट कार्ड तयार करणे, साथीदारांना डेबिड कार्डचे वाटप करणे़ त्यांच्याकडून रोकड काढण्यास सांगणे, अशा पद्धतीने  त्याने गुन्हा केल्याचे उघडकीस आले आहे. शेख याचा सहभाग आढळून आल्यानंतर इंटरपोलने रेडकॉर्नर नोटीस बजावली होती. कॉसमॉस बँकेच्या एटीएम स्वीचवर  ११ आणि १३ ऑगस्ट २०१७ रोजी सायबर हल्ला करुन बँकेतील ९४ कोटी ४२ लाख रुपये काढून घेण्यात आले होते. हाँगकॉगमधील हेनसेंग बँकेत आरोपींनी १२ कोटी रुपये वळवले होते. ते गोठविण्यात पुणे पोलिसांना यश मिळाले होते. त्यापैकी ६ कोटी रुपये काँसमॉस बँकेला आतापर्यंत परत मिळाले आहेत.

Web Title: Big success! Cosmos Bank cyber attack case main accused was arrested in UAE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.