पायवाटांवर वर्दळ मोठी; पण टेकड्यांवरचा एकांत धोक्याचाच..!
By admin | Published: February 27, 2016 04:39 AM2016-02-27T04:39:50+5:302016-02-27T04:39:50+5:30
वेताळ टेकडीचा विस्तीर्ण परिसर, दाट झुडपे, बंद पडलेली खाण, एकांतात बसलेली जोडपी, एकट्या फिरणाऱ्या तरुणी... सूर्य मावळतीला चाललेला... अंधार पडत चालल्याने लोकांची
पुणे : वेताळ टेकडीचा विस्तीर्ण परिसर, दाट झुडपे, बंद पडलेली खाण, एकांतात बसलेली जोडपी, एकट्या फिरणाऱ्या तरुणी... सूर्य मावळतीला चाललेला... अंधार पडत चालल्याने लोकांची वर्दळही कमी होते... पण याची फिकीर कुणाला? अशा स्थितीतही एकट्या तरुणी, जोडपी स्वत:च्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून आपल्याच नादात असल्याचे दृश्य वेताळ टेकडीवर पाहायला मिळाले.
व्यायाम किंवा फिरायला टेकड्यांवर जाणाऱ्या पुणेकरांच्या यादीत वेताळ टेकडी हेही आवडीचे ठिकाण. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण या टेकडीवर फिरण्याचा, व्यायामाचा आनंद घेतात. शुक्रवारीही या टेकडीवर गेल्यानंतर हेच दृश्य पाहायला मिळाले. प्रत्येक जण टेकडीवरील पायवाटांवरून फिरत होता. ज्येष्ठ नागरिक व तरुणाचे प्रमाण जास्त दिसते. काही जोडपी आणि एकट्या महिला व तरुणीही दिसून आल्या. वेताळ टेकडीवर सायंकाळी फिरण्यासाठी येणाऱ्यांची मोठी वर्दळ असली, तरी या टेकडीवर असलेली दाट झुडपे आणि बंद पडलेल्या खाणीमुळे एकांत धोक्याचा ठरू शकतो. टेकडीचा विस्तीर्ण परिसर मोठा असून झाडाझुडपांचे प्रमाणही जास्त आहे. अंधार पडल्यानंतर काही जोडपी व एकट्या मुली बिनधास्तपणे टेकडीवरील निर्जन ठिकाणी फिरताना आढळून आली.
टेकडीचा परिसर मोठा असून अनेक पायवाटा आहेत. या रस्त्यानेही महिला-तरुणी एकट्या बिनधास्तपणे फिरताना दिसल्या. टेकडीवर असलेल्या बंद खाणीलगत तरुण-तरुणींचे घोळके, जोडपी दिसून आली. अंधार वाढत गेल्यानंतरही काही जोडपी खाणीच्या दिशेने जात होती. एकट्या मुलीही मोबाइलवर गाणी ऐकत फिरत होत्या. परिसरातील दाट झुडपांमुळे हा एकांत धोक्याचा ठरू शकतो, याचे भानही त्यांना नव्हते.
पायवाटांच्या बाजूला ठिकठिकाणी सिमेंटच्या टाक्या ठेवण्यात आल्या आहेत. टेकडीवर येताना आणलेला कचरा लोक या टाक्यांमध्ये टाकतात. यांतील काही टाक्यांमध्ये मद्याच्या बाटल्या, प्लॅस्टिकचे ग्लास, पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या प्लेट आढळून आल्या. त्यामुळे या टेकड्यांवर मद्यपींचा वावर किंवा ओल्या पार्ट्याही रंगत असतील, अशी शक्यता आहे.
वन विभाग व पुणे महापालिकेमार्फत नागरी वनव्यवस्थापन समितीमार्फत टेकडीवर व्यवस्थापन केले जाते. पण, सिमेंटच्या टाक्यांमधील मद्याच्या बाटल्या पाहून या बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. टेकडीचा विस्तीर्ण परिसर पाहता, सुरक्षा पुरविणे शक्य नसल्याने प्रत्येकाने आपल्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे.
(टीम लोकमत : राहुल कलाल, हिना कौसर खान-पिंजार, राजानंद मोरे,
लक्ष्मण मोरे, सायली जोशी-पटवर्धन, अनिरुद्ध करमरकर, दत्तप्रसाद शिंदे.)