Pune | द्राक्षाच्या भावात १० वर्षातील सर्वात मोठी घसरण, उत्पादक शेतकरी अडचणीत
By अजित घस्ते | Published: April 22, 2023 05:54 PM2023-04-22T17:54:14+5:302023-04-22T17:59:08+5:30
३० ते ४० टक्के राज्यातील द्राक्षे उत्पादक शेकऱ्यांचे यंदा नुकसान...
पुणे : राज्यात गारपीठ व अवकाळी पावसाचा द्राक्षाला मोठा फटका बसला आहे. नाशिक, नगर भागात अद्याप २५ ते ३० हजार टन माल जागेवरच आहे. शेतात उभे असलेले पीक जाण्याच्या मार्गांवर असताना अवकाळी पाऊस फटका बसल्याने अनेक द्राक्षे बागाचे मोठे नुकसान झाले. मालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजारात द्राक्षे पाठवत आहेत. मात्र बाजारात द्राक्षाला उठाव नसल्याने दरही मिळत नाही. परिणामी द्राक्षे बागायतदारांचा खर्चही निघत नसल्याने यंदा शेतकरी हतबल झाले असल्याने पुढील वर्षी द्राक्षेचे पीक घ्यायचे की नाही, हा प्रश्न द्राक्षे बागायतदारांना पडत आहे.
लॉकडॉऊन काळातही द्राक्षांना ३५ ते ४० रूपये किलोला भाव मिळत होता. मात्र सध्या घाऊक बाजारात १५ ते ३० रूपये पर्यत द्राक्षेला भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च ही निघत नसल्याने यंदा शेतकरी अडचणीत आहे. दरवर्षी १५ डिसेंबर पासून द्राक्षाचा हंगाम सुरू होतो. एप्रिलपर्यंत चालत असतो. यंदा मे अखेरपर्यंत हंगाम सुरू राहिल. फळेही उशीरा लागल्याने द्राक्षाचा हंगाम महिनाभराने पुढे सरकला आहे. पावसाळी वातावरण कायम राहिल्यास द्राक्षाच्या भावात आणखी घट होण्याची शक्यता असल्याचे मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.
बाजारातील १५ किलो द्राक्षाचे भाव
द्राक्ष भाव
सोनाका ४०० ते ४५०
सुपर सोनाका ४०० ते ५००
तास गणेश ३०० ते ३५०
माणिक चमण ३५० ते ४००
का झाले दर कमी
- अवकाळी पावसाचा द्राक्षाला मोठा फटका
- वारंवार पावसामुळे यंदा द्राक्षांच्या पिकाची गोडी कमी झाल्याने परदेशात मागणी घटली.
- परदेशात मागणी कमी झाल्याने बागेत द्राक्षे शिल्लक
- अद्यापही पावसाचे सावट कायम
- बाजारात मागणी कमी आणि आवक अधिक
- बाजारात सर्व मालाची विक्री त्या प्रमाणात होत नाही.
राज्यातील काही पट्टयात द्राक्षाला चांगला भाव मिळाला असला तर काही भागात बरेच शेतक-यांचे ३० ते ४० टक्के नुकसान झाले आहे. एकरी ५ लाख खर्च होतो. एक किलो २० ते २२ रूपये खर्च करावा लागतो. मात्र यंदा मालाची विक्रीच घाऊकमध्ये १५ ते २० रूपये होत असल्याने शेतक-यांना खर्चही निघत नाही. ज्या शेतक-यांचे ४० टन पेक्षा माल गेला आहे. त्याना किमान उत्पादन खर्च निघाला आहे. मात्र त्यांचे १० टनाच्या आत उत्पादन निघाले आहे. अशा बागायदारांना उत्पादन खर्च हि निघाला नाही. त्यामुळे शेतकरी यंदा संकटात सापडला आहे.
- शिवाजी पवार , अध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्षे बागायतदार संघ