विद्यार्थ्यांनी साकारले बाप्पांचे सर्वांत मोठे चित्र

By admin | Published: September 22, 2015 03:20 AM2015-09-22T03:20:33+5:302015-09-22T03:20:33+5:30

कृती, निर्मिती आणि संस्कृतीचा संदेश देणाऱ्या ‘लोकमत आपले बाप्पा’ उपक्रमात विद्यार्थ्यांनी आजपर्यंतचे गणेशाचे सर्वांत मोठे मोझॅक चित्र साकारून गणरायाला वंदन केले.

The biggest picture of the students who made the students | विद्यार्थ्यांनी साकारले बाप्पांचे सर्वांत मोठे चित्र

विद्यार्थ्यांनी साकारले बाप्पांचे सर्वांत मोठे चित्र

Next

पुणे : कृती, निर्मिती आणि संस्कृतीचा संदेश देणाऱ्या ‘लोकमत आपले बाप्पा’ उपक्रमात विद्यार्थ्यांनी आजपर्यंतचे गणेशाचे सर्वांत मोठे मोझॅक चित्र साकारून गणरायाला वंदन केले. तब्बल ५२०० विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या बाप्पांची प्रतिमा साकारली आणि म्हाळुंगे-बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात बाप्पांचा जल्लोष झाला.
श्री शिव छत्रपती क्रीडासंकुलातील विस्तीर्ण मैदानावर रंगलेल्या या अभूतपूर्व सोहळ्याने डोळ्यांचे पारणे फेडले. पुण्याच्या ऐतिहासिक गणेशोत्सवाला आगळेवेगळे महत्त्व आहे. त्यामुळे या गणेशोत्सवामध्ये आपल्या कृतीतून नवनिर्मिती करीत संस्कृती जोपासणारे उपक्रम राबविण्याच्या हेतूने ‘लोकमत’च्या माध्यमातून मागील वर्षापासून ‘आपले बाप्पा’ हा आगळावेगळा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमांतर्गत चित्ररूपी गणराय साकारून पुणेकरांना विश्वविक्रमाची अनोखी भेट दिली. यंदाही सिद्धिविनायक ग्रुप प्रस्तुत आणि संजय घोडावत ग्रुप सहप्रायोजक असलेल्या ‘लोकमत आपले बाप्पा’ उपक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला.
श्री शिव छत्रपती क्रीडासंकुलातील मुख्य स्टेडियममध्ये सकाळपासूनच गणरायाला वंदन करण्यासाठी उत्साह ओसंडून वाहत होता. पुणे व पिंपरी चिंचवड शहर व परिसरातील विविध शाळांमधील तब्बल पाच हजार दोनशे विद्यार्थी या वेळी एकत्रित आले होते. आकाशात ढगांची दाटी अन् मैदानावरील हिरवळीवर बालचमुंच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाने आल्हाददायक बनलेल्या वातावरणात प्रत्येक जण गणरायाला अनोखे वंदन करण्यासाठी आसुसलेला होता. गणेशाची भव्य प्रतिमा साकारण्यासाठी ५०-५० विद्यार्थ्यांचे १०४ गट करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शिस्तबद्धपणे स्टेडियमच्या मैदानावर बसविण्यात आले. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याकडे गणरायाच्या प्रतिमेसाठी तयार करण्यात आलेले एक-एक शीट देण्यात आले. आपल्या लाडक्या बाप्पाला अशा आगळ्या-वेगळ्या प्रकारे वंदन करण्यासाठी विद्यार्थ्यांचा उत्साहही शिगेला पोहोचला होता. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अवघ्या पाच मिनिटांत विद्यार्थ्यांनी त्यांना दिलेले शीट उंचावून बाप्पांची भव्य प्रतिमा साकारली. त्यानंतर ढोल-ताशांच्या निनादात जल्लोष साजरा करण्यात आला. उपस्थितांनीही टाळ्यांच्या कडकडाटात या उपक्रमाला दाद दिली. या वेळी सिद्धिविनायक ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार साकला, संजय घोडावत ग्रुपचे अध्यक्ष संजय घोडावत, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, न्यू पुना बेकरीचे कुणाल भूषण गिरमकर आदी उपस्थित होते. लोकमतचे संपादक विजय बाविस्कर, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई, महाव्यवस्थापक मिलन दर्डा यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. श्री शिवछत्रपती क्रीडासंकुल, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि., हॉटेल कोर्टयार्ड मॅरिएट, न्यू पूना बेकरी आणि कोलते-पाटील डेव्हलपर्स यांनी या उपक्रमाला सहकार्य केले.

Web Title: The biggest picture of the students who made the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.