सत्ता नाकारून सेवा करणे हा मोठा त्याग - उल्हास पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 03:00 AM2017-12-10T03:00:09+5:302017-12-10T03:00:19+5:30
‘पंतप्रधानपद चालून आलेलें असताना ते नाकारून देशसेवा करण्याचा विचार हा सर्वांत मोठा त्याग आहे. तो करून सोनिया गांधी यांनी सेवाव्रतच स्वीकारले,’ असे प्रतिपादन माजी आमदार उल्हास पवार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘पंतप्रधानपद चालून आलेलें असताना ते नाकारून देशसेवा करण्याचा विचार हा सर्वांत मोठा त्याग आहे. तो करून सोनिया गांधी यांनी सेवाव्रतच स्वीकारले,’ असे प्रतिपादन माजी आमदार उल्हास पवार यांनी केले.
काँग्रेस भवन येथे विविध क्षेत्रातील महिलांना सेवाव्रत पुरस्कार देऊन काँग्रेसच्या मावळत्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांचा ७१ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी जैनब बागवे यांनी केक कापला. जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार, मुस्लिम सत्यशोधक विचार मंचच्या डॉ. बेनझीर तांबोळी, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. शीतल धडफळे-महाजन, पत्रकार अंजली खमीतकर, अभिनेत्री अदिती द्रविड, गायिका जुईली जोगळेकर, नृत्य दिग्दर्शिका निकिता मोघे, फॅशन डिझायनर निवेदिता साबू, बॉक्सर मिराज जहांगिर शेख या महिलांना सेवाव्रत पुरस्कार प्रदान करण्यात आला. याचवेळी ७१ अंगणवाडी शिक्षिका व सेविका यांचाही गौरव करण्यात आला. शहराध्यक्ष बागवे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पवार यांनी या वेळी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पोलादी कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला. पुरस्कार विजेत्या उज्ज्वला पवार यांना काँग्रेस भवनसारख्या ऐतिहासिक वास्तूमध्ये सोनिया गांधी यांच्या नावाचा पुरस्कार मिळतो आहे ही फार आनंदाची गोष्ट असल्याचे सांगितले. डॉ. धडफळे, अंजली खमीतकर, डॉ. तांबोळी, साबू, मोघे यांनीही मनोगत व्यक्त केले. शहर महिला काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. रमेश अय्यर यांनी आभार मानले. माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश काँग्रेसचे अभय छाजेड, नगरसेवक अजित दरेकर व काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख या वेळी उपस्थित होते.