नायलॉन मांजामुळे कापला दुचाकीस्वाराचा गळा; बंदी असतानाही बाजारात मिळतोय का?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 09:05 AM2024-12-09T09:05:44+5:302024-12-09T09:05:55+5:30
नायलॉन आणि चायनीज मांजाच्या विक्रीस कायद्याने बंदी असतानाही, शहरात संक्रांतीचा सण जवळ आल्यावर अनेक ठिकाणी या मांजाची विक्री सुरू होते
पुणे : दुचाकीवरून जात असताना मांजा गळ्याला कापल्याने रविवारी दुपारी तरुण जखमी झाला. मार्केट यार्डजवळील डायस प्लॉट वसाहतीच्या परिसरात ही घटना घडली. हृषिकेश वाघमोडे (रा. भारती विद्यापीठ) असे या तरुणाचे नाव असून, त्याच्या गळ्याला आणि हाताला टाके पडले. वैद्यकीय उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
अधिक माहितीनुसार, हृषिकेश वाघमोडे हे रविवारी दुपारी कार्यालयीन कामानिमित्त दुचाकीवरून मार्केट यार्ड परिसरात जात होते. डायस प्लॉट वसाहतीजवळील पुलावरून जात असताना अचानक गळ्याला काही तरी कापल्याची जाणीव झाली. त्यांनी पटकन गळ्याला हात लावला असताना तेथे मांजा असल्याचे समजले. मांजा काढत असताना, त्यांच्या हाताची बोटेही कापली गेली. दुचाकी रस्त्यावर सोडून त्यांनी बाजूला उतरण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना तत्काळ मदत केली आणि दवाखान्यात नेले.
नायलॉन आणि चायनीज मांजाच्या विक्रीस कायद्याने बंदी असतानाही, शहरात संक्रांतीचा सण जवळ आल्यावर अनेक ठिकाणी या मांजाची विक्री सुरू होते. हा मांजा कापल्याने दरवर्षी गंभीर स्वरूपाचे अपघात होतात. मांजामध्ये अडकून अनेक पक्ष्यांचे मृत्यूही झाले आहेत. या मांजाच्या विक्रीवर पूर्ण बंदी आणावी; तसेच चिनी बनावटीचा मांजा वापरणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक सातत्याने करत आहेत.