Pune: पुलावरून कोसळून दुचाकी चालक ठार, नेरे वरवडी दरम्यानच्या पुलावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 21:01 IST2023-11-02T21:01:10+5:302023-11-02T21:01:50+5:30
पवार हे वारकरी संप्रदायातील होते. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच बसरापूर गावावर शोककळा पसरली....

Pune: पुलावरून कोसळून दुचाकी चालक ठार, नेरे वरवडी दरम्यानच्या पुलावरील घटना
खानापूर (पुणे : वीसगाव खोऱ्यातील नेरे वरवडी दरम्यानच्या पुलावर बंद पडलेली दुचाकी अचानक चालू होऊन वेगाने चालकासह ओढ्यात कोसळून दुचाकी चालक ठार झाला. अपघातात दुचाकी चालक शांताराम मारुती पवार (रा. बसरापूर, ता. भोर वय ६२) ठार झाले. पवार हे वारकरी संप्रदायातील होते. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच बसरापूर गावावर शोककळा पसरली.
या संदर्भात भोर पोलिससूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी चालक शांताराम पवार (रा. बसरापूर ता.भोर,वय ६२) हे वरवडी येथे नातेवाइकाच्या तेरावा विधीसाठी दुचाकीवरून (दुचाकी क्र.एम.एच.१२ पी.डी.१७२४) वरवडी येथे गेले होते. तेराव्याचा विधी उरकून ते एका सहप्रवाशाबरोबर भोरकडे निघाले असता वरवडी नेरे दरम्यानच्या ओढ्यावरील पुलावर दुचाकी बंद पडल्याने सहप्रवासी तानाजी बाबुराव कोंढाळकर(रा.अंबाडे वय ५५) हे खाली उतरले. त्यानंतर दुचाकी चालक पवार यांनी गाडीची तपासणी करून दुचाकी चालू करण्यासाठी बटण दाबले असता अचानक दुचाकीने वेग घेतला व पवार यांच्यासह दुचाकी ओढ्याच्या पात्रात कोसळली. सहप्रवाशी कोंढाळकर हे गाडीवरून उतरले होते त्यामुळे ते बचावले.