विद्यावेतन न मिळाल्याने विद्यापीठात भीक मांगाे अांदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 07:26 PM2018-06-19T19:26:12+5:302018-06-19T19:26:12+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एम फील अाणि पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या दाेन महिन्यांपासून विद्यावेतन न मिळाल्याने मंगळवारी विविध विद्यार्थी संघटनांनी भीक मांगाे अांदाेलन केले.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून एम फील अाणि पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या दाेन महिन्यांपासून विद्यावेतन देण्यात न अाल्याने विविध विद्यार्थी संघटनांनी मंगळवारी विद्यापीठात भीक मांगाे अांदाेलन केले. यावेळी अांदाेलनातून जमा झालेले पैसे प्र-कुलगुरुंना देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. त्यांनी ते न स्वीकारल्याने उद्या या पैशांचा डिमांड ड्राफ्ट विद्यार्थ्यांकडून विद्यापीठाला देण्यात येणार अाहे.
या अांदाेलनात भारतीय विद्यार्थी काॅंग्रेस, डाफसा, राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेस अादी संघटनांनी सहभाग घेतला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये एम फील, पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या दाेन महिन्यांपासून विद्यावेतन मिळाले नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे अाहे. हे विद्यावेतन न मिळाल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत अाहे. त्याचबराेबर त्यांच्या संशाेधनासाठीही त्यांना अनेक अडचणी येत अाहेत. त्यामुळे मंगळवारी विविध विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन भीक मांगाे अांदाेलन करण्यात केले. या अांदाेलनाला जनता दल युनायटेडचे प्रदेश सरचिटणीस कुलदीप अांबेकर यांनीही पाठींबा दिला हाेता. विद्यापीठाच्या चाैकातील सिग्नलवर तसेच विविध विभागांमध्ये जात प्रतिकात्मक भीक मांगाे अांदाेलन करण्यात अाले.
या अांदाेलनाविषयी बाेलताना भारतीय विद्यार्थी काॅग्रेसचे विद्यापीठ अध्यक्ष सतीष गाेरे म्हणाले, गेल्या दाेन महिन्यांपासून एम फिल, पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून विद्यावेतन देण्यात अालेले नाही. विद्यापीठाकडून बजेटमध्ये या विद्यावेतनाबाबत तरतूद करण्यात अाली नव्हती. विद्यावेतन न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत अाहे. पीएचडी करणारे अनेक विद्यार्थी हे दुसरीकडे कुठेही जाॅब करीत नाहीत. त्यामुळे विद्यावेतन बंद झाल्याने अश्या विद्यार्थ्यांचे जेवणाचे देखिल हाल झाले. त्यामुळे विद्यापीठाने लवकरात लवकर विद्यावेतन सुरु करावे अशी अामची मागणी अाहे.