बिल भरा, नाही तर वीज कट
By admin | Published: March 4, 2016 12:23 AM2016-03-04T00:23:24+5:302016-03-04T00:23:24+5:30
वीज बिल भरा, नाही तर वीजजोड तोडण्यात येईल, असे फर्मान महावितरणने सोडले आहे. महावितरणचे कर्मचारी स्पिकरवरून अनाउन्समेंट करीत शहरात फिरत आहेत.
पिंपरी : वीज बिल भरा, नाही तर वीजजोड तोडण्यात येईल, असे फर्मान महावितरणने सोडले आहे. महावितरणचे कर्मचारी स्पिकरवरून अनाउन्समेंट करीत शहरात फिरत आहेत. मार्च महिन्यात वार्षिक बिल वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी महावितरणने हा फंडा अवलंबला आहे. या प्रकारच्या दवंडीने नागरिकांनी धास्ती घेतली आहे.
मार्च महिना म्हटले की, आर्थिक वर्षाचे टार्गेट पुणे करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी धावपळ करतात. बॅँका तसेच सरकारी आणि खासगी संस्था आणि कार्यालये आपले हिशोब आणि ताळेबंद पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. महावितरणही यात मागे नाही. वार्षिक टार्गेट पूर्ण करण्यासाठी महावितरणतर्फे विविध फंडे अवलंबिले जात आहेत. वीज बिल भरण्याचे आवाहन करणारी वाहने शहरात फिरत आहेत. मराठी आणि हिंदी भाषेत अनाउन्समेंट करीत बिल भरण्याचे आवाहन केले जात आहे. बिल भरा, नाही तर वीज खंडित केली जाईल, असे सांगितले जात आहे. अचानक या प्रकारे महावितरणकडून अनाउन्समेंट होत असल्याने नागरिक धास्तावले आहेत.
यामुळे नागरिक दक्ष झाले असून, परीक्षेच्या या हंगामात
वीजजोड खंडित होण्याची कारवाई होऊ नये म्हणून नागरिक काळजी घेत आहेत. (प्रतिनिधी)अॅप आणि आॅनलाइन पेमेंटला पसंती
महावितरणच्या अॅप आणि आॅनलाइन बिलाचे पेमेंट करण्यास सुशिक्षित मंडळींचा कल आहे. त्यामुळे घरबसल्या काही सेकंदात बिल अदा केले जात आहे. पिंपरी विभाग सर्वाधिक ग्राहक आॅनलाइन पेमेंटला पसंती देत आहेत. भोसरी विभागात औद्योगिक ग्राहकांना आॅनलाइन बिल भरणे सक्तीचे असल्याने ते नियमितपणे त्या पद्धतीनेच भरतात. स्मार्ट फोनवर अॅप डाउनलोड करून बिल भरणारे असंख्य ग्राहक आहेत.
नागरिकांना बिल भरण्यासाठी या माध्यमातून जागृत केले जात आहे. या महिन्यात सर्वाधिक सुट्या आहेत. यात बिल भरणे राहून गेल्यास कारवाई होऊ शकते. त्यामुळे वीजजोड खंडित करण्याची कारवाई महावितरणच्या कर्मचाऱ्यांना करावी लागते. यामुळे संबंधित ग्राहक आणि त्यांच्या कुटुंबीयांना विजेअभावी नाहक गैरसोयीला सामोरे जावे लागते. वेळेवर बिल भरून पुढील मनस्ताप टाळावा.
- धर्मराज पेटकर,
कार्यकारी अभियंता, भोसरी