कंत्राटी कामगारांसाठी संसदेत विधेयक मांडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:32 AM2019-02-20T00:32:06+5:302019-02-20T00:32:19+5:30
अजित अभ्यंकर : कोरेगाव भीमा येथील मेळाव्यास दहा हजार कामगार उपस्थित
कोरेगाव भीमा : कारखान्यात मालकांपेक्षा मनोविकृत व्यवस्थापनच कामगारांची पिळवणूक करत असल्याने अशा व्यवस्थापनाविरुद्धच लढण्याची वेळ आली असून, कामगार लढ्याबाबत योग्य नियोजन हवे. त्याचबरोबर शिकाऊ कामगार म्हणजेच निमकामगारांना इतर कामगारांप्रमाणेच पीएफ, ईएसआयसह सर्व कायदे लागू असल्याचे सांगत कंत्राटी कामगारांविषयी संसदेत खासगी विधेयक लवकरच मांडले जाणार असल्याचेही ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर यांनी सांगितले.
डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथिल ट्रॅन्टर कारखान्यातील १७ कायम कामगारांना कारखाना व्यवस्थापनाने गेल्या अडीच महिन्यांपूर्वी कामावरून तडकाफडकी काढून टाकण्यात आल्यानंतर गत ८० दिवसांपासून ट्रॅन्टर कारखान्याच्या गेटवर कामगारांचे कुटुंबीयांसह आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या पुणे जिल्ह्यातील शिरूर, रांजणगाव, सणसवाडी, पिंपरी-चिंचवड, बारामती, इंदापूर, भोसरी, चाकण, खेडसह शिरवळ औद्योगिक परिसरातील दहा हजार कामगार पायी रॅलीद्वारे येऊन गौरीनंदन मंगल कार्यालयात कामगारांचा मेळावा झाला.
या मेळाव्याप्रसंगी अजित अभ्यंकर बोलत होते. यावेळी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघांचे अध्यक्ष किशोर ढोकले, शिवाजीराव खटकाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, मारुती भापकर, रमेश सातपुते, अविनाश वाडेकर, दत्तात्रय येळवंडे, राजेंद्र दरेकर, गणेश जाधव, दिगंबर पाटील, किरण देशमुख, नारायण हरगुडे, कैलास मुंगशे, रमेश बनकर आदी
उपस्थित होते.
यावेळी किशोर ढोकले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्या कामगारांची गुलामीकडे वाटचाल चालू असून महागाईच्या प्रमाणात पगार कमी होत चालले आहेत. शासनाच्या कामगारविरोधी धोरणांमुळे व भांडवलदारांच्या दबावाखाली कंत्राटीप्रमाणेच कायम कामगार पद्धतशीरपणे संपवला जातोय.
यावेळी अप्पर कामगार आयुक्त शैलेश पोळ व उपायुक्त पनवलकर यांना कामगारांच्या मागण्यांसंदर्भात निवेदन यावेळी दिले. प्रास्ताविक राजेंद्र दरेकर यांनी केले. सूत्रसंचलन चंद्रकांत कदम तर आभार रूपेश वरपे यांनी मानले.
लढा देण्यासाठी एकत्र या..
४कारखान्यात महिलांना कोणत्याही सुविधा तर दिल्या जातच नाही शिवाय मुद्दाम रात्रपाळीला बोलावले जाते, अशा अमानवी कारखानदार व त्यांना सहकार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांविरोधात पद्धतशीरपणे लढा देण्याची वेळ आली असल्याचे सांगत ऐन दिवाळीत १७ कामगारांना बाहेर काढणाºया टॅन्टर कंपनीचा रोग इतर कारखान्यात पसरू नये, यासाठी आपण एकत्र लढायला हवे. या विरोधात फौजदारी कारवाईसह सर्वकष लढा देण्यासाठी एकत्र या, असेही आवाहन त्यांनी केले.
४राष्ट्रवादी कामगार संघटनेचे शिवाजीराव खटकाळे म्हणाले, कामगारांचे भवितव्य अंधारात असून परस्पर मतभेद बाजुला ठेवून एकजुट ठेवली तरच कामगारांचे प्रश्न सुटतील.
४निमकामगारांच्या हितासाठी कारखाना मालकावरही शासनाने निर्बंध ठेवत कामगार कमी करताना परवानगीही बंधनकारक केली पाहिजे. तर मारुती भापकर यांनी भांडवलदारांच्यादबावामुळे सरकारकडून शेतकरी, कामगारांचे केवळ शोषण होत असल्याने यापुढे सर्व घटकांना एकत्र करून लढा द्यावा लागेल, असे सांगितले.