जुन्या नोटांमधून पालिका अब्जाधीश

By admin | Published: November 17, 2016 03:45 AM2016-11-17T03:45:11+5:302016-11-17T03:45:11+5:30

सरकारी कर जमा करण्यासाठी रद्द करण्यात आलेल्या नोटा स्वीकारता येतील, हा केंद्र सरकारचा निर्णय पालिकेसाठी चांगलाच लाभदायक ठरला आहे.

Billionaire of Old Notes | जुन्या नोटांमधून पालिका अब्जाधीश

जुन्या नोटांमधून पालिका अब्जाधीश

Next

पुणे : सरकारी कर जमा करण्यासाठी रद्द करण्यात आलेल्या नोटा स्वीकारता येतील, हा केंद्र सरकारचा निर्णय पालिकेसाठी चांगलाच लाभदायक ठरला आहे. ११ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर या ६ दिवसांच्या कालावधीत पालिका मिळकत कराच्या भरण्यातून अब्जाधीश झाली आहे. १०० कोटी रुपयांचा आकडा पालिकेने बुधवारी ओलांडला असून जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत २४ नोव्हेंबरपर्यंत असल्याने यात आणखी भर पडेल, असा विश्वास पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
पालिकेच्या मिळकत कर विभागाला या आर्थिक वर्षात १ हजार ४०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मागील वर्षी अभय योजनेच्या माध्यमातून पालिकेला १ हजार २०० कोटी रुपये मिळाले होते. यावर्षी मात्र दोन वेगवेगळ्या अभय योजना जाहीर करून व त्यांना २ वेळा मुदतवाढ देऊनही पालिकेच्या तिजोरीत फारशी भर पडत नव्हती. नोटाबंदीचा निर्णय आल्यावर, तर प्रशासनाचे धाबेच दणाणले होते, मात्र ११ नोव्हेंबरला केंद्र सरकारने सरकारी करासाठी जुन्या नोटा चालतील, असे जाहीर केले व त्या एकाच दिवसात रात्री १२ वाजेपर्यंत पालिकेच्या तिजोरीत ४० कोटी रुपये जमा झाले. थकबाकीदारांना रांग लावून जुन्या नोटांच्या माध्यमातून कर जमा केला.
त्यानंतर केंद्र सरकारने ही मुदत वाढवत नेली व पालिकेला त्याचा फायदाच होत गेला. १२ नोव्हेंबरला ७ कोटी ५७ लाख, १३ ला ८ कोटी ५६ लाख, १४ ला अखेरची मुदत असल्याने २१ कोटी ७१ लाख रूपये जमा झाले. त्यानंतर आता मुदत २४ तारखेपर्यंत वाढविण्यात आली. त्यामुळे भरणा थोडा कमी झाला असला, तरी १५ला १९ कोटी ३८ लाख रूपये व बुधवारी (दि. १६) सायंकाळी ६ वाजेपर्यंत ४ कोटी ४३ लाख रूपये जमा झाले. एकूण रक्कम १०१ कोटी ७ लाख रूपये झाली आहे.

Web Title: Billionaire of Old Notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.