बिंग चॅट, क्लाऊड चॅट आणि कुरुलकर कनेक्शन; पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 09:01 AM2023-07-09T09:01:52+5:302023-07-09T09:02:12+5:30
कुरुलकरने भारत सरकारला संरक्षण संबंधित उपकरणे पुरविणाऱ्या आणि डिफेन्स रोबोट्स बनविणाऱ्या एका खासगी कंपनीच्या सीईओची माहितीही पाकिस्तानी गुप्तहेरासोबत शेअर केली.
पुणे - महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने डीआरडीओचा शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकरविरुद्ध पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यामध्ये अनेक सोशल मीडिया अॅप्स, बिंग चॅट आणि क्लाऊड चॅट या अॅप्लिकेशनचा वापर केल्याचे सांगितले आहे. कुरुलकरने सोशल मीडियाचा वापर करून संवेदनशील तपशील दिला. कुरुलकर आणि झारा दासगुप्ता व्हॉट्सॲपद्वारे संपर्कात होते. त्यासोबतच ते बिंग चॅट आणि क्लाऊड चॅटवरून बोलत होते. त्यांच्यामधील झालेले संभाषण समोर आले आहे. पहिल्या चॅटमध्ये कुरुलकरने झाराला सरफेस टू एअर मिसाईल (एसएएम) याबद्दल माहिती दिली, तर दुसऱ्या चॅटमध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्राबद्दल माहिती दिल्याचे समोर आले आहे.
पाकिस्तानी गुप्तहेर द्वारा दासगुप्ता कुरुलकरच्या प्रकल्पांशी संबंधित लिंक पाठवत असे आणि त्यानंतर कुरुलकर तिच्यासोबत संभाषण करताना त्या प्रकल्पांची तपशीलवार माहिती देत असे. कुरुलकरने भारत सरकारला संरक्षण संबंधित उपकरणे पुरविणाऱ्या आणि डिफेन्स रोबोट्स बनविणाऱ्या एका खासगी कंपनीच्या सीईओची माहितीही पाकिस्तानी गुप्तहेरासोबत शेअर केली. यासोबतच डीआरडीओशी संबंधित अनेक लोकांची माहिती, डीआरडीओचे ड्युटी चार्टही कुरुलकरने शेअर केले.
कुरुलकरने संरक्षण प्रकल्पात वापरण्यात आलेल्या साहित्याची रचना, गुजरातमधील संरक्षण कार्यक्रमात दाखविण्यात आलेले पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, आकाश लाँचरची माहिती, नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजमध्ये काय, काय आहे? याची माहिती दिली. तसेच ब्राह्मोस लाँचर, ड्रोन, यूसीव्ही, अग्नी क्षेपणास्त्र लाँचर आणि मिलिटरी ब्रिजिंग सिस्टीम, पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र (एसएएम), ड्रोन, ब्राह्मोस आणि अग्नी क्षेपणास्त्र लाँचर्स आणि यूसीव्ही यासह विविध प्रकल्पांबद्दलही माहिती दिली