पर्यावरण समृद्ध जुन्नरमधील जैवविविधता संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:13 AM2021-08-27T04:13:50+5:302021-08-27T04:13:50+5:30

खोडद : जुन्नर तालुका समृद्ध जैवविविधतेने नटलेला आहे. या परिसरात असलेली विविध जैवविविधता हे समृद्ध पर्यावरणाचे लक्षण आहे. विविध ...

Biodiversity crisis in environmentally rich Junnar | पर्यावरण समृद्ध जुन्नरमधील जैवविविधता संकटात

पर्यावरण समृद्ध जुन्नरमधील जैवविविधता संकटात

googlenewsNext

खोडद : जुन्नर तालुका समृद्ध जैवविविधतेने नटलेला आहे. या परिसरात असलेली विविध जैवविविधता हे समृद्ध पर्यावरणाचे लक्षण आहे. विविध अभ्यासकांनी आणि संशोधकांनी जुन्नरच्या भूमीत पर्यावरणासाठी काम करत आजवर हा समृद्ध नैसर्गिक ठेवा जपला आहे. परंतु, तरीही गेली काही वर्षांपासून पर्यटनाच्या व विकासाच्या नावाखाली जंगलांचं कधीही न भरून येणारे असे नुकसान वनसंपत्तीचे होत आहे. त्यामुळे वृक्ष संवर्धनाचे महत्व अधिकच अधोरेखित होत आहे.

आतापर्यंत पारंपरिक पद्धतीने वृक्षलागवड करून आपण निसर्गाची जी हानी केली आहे, ती भरून येणारी नाही. त्यासाठी आपल्याला आधुनिक पद्धतीने मग जपानमध्ये विकसित झालेले मियावाकी तंत्रज्ञान किंवा सीड बोल ट्री प्लांटेशन अशा पद्धतीने अति घन जंगले निर्माण करावी लागतील. त्याचा नैसर्गिक समतोल साधण्यासाठी मानवी हस्तक्षेपापासून ही दूर ठेवावी लागतील. पाणी ही नैसर्गिक साधन संपत्ती फक्त आणि फक्त जंगलांच्या माध्यमातूनच भूगर्भात साठविणे शक्य आहे आणि ते साठवले नाही तर भविष्यात पाणी आटून जाईल आणि खूप मोठे कधीही भरून न येणारे संकट आपल्यासमोर उभे राहील. पर्यावरण संवर्धनासाठी संवर्धन चळवळी उभ्या राहाव्या लागतील. तालुक्यातून राज्य, देश आणि आंतराष्ट्रीय पातळीवर निसर्गप्रेमी आणि समविचारी लोकांनी एकत्र येऊन संवर्धनाचं महत्व सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी गावोगावी तज्ज्ञांनी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करता येऊ शकते. लोकसहभाग आणि प्रशासनाची जोड मिळाल्यास दृश्य स्वरूपातील बदल आपल्याला दिसून येऊ शकतो.

पर्यटनाचा व निसर्ग सहलींचा होणारा अतिरेक नियंत्रणात आणण्याची गरज आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न न झाल्यास निसर्गाच्या रौद्र रुपास संपूर्ण जगास सामोरे जावे लागेल असे सर्वच शास्त्रज्ञ सांगत आहेत. यामध्ये संपूर्ण मानवजातीला धोका निर्माण होऊ शकतो. अतिवृष्टी, ओला व कोरडा दुष्काळ, वादळं, समुद्राच्या पाणीपातळीत वाढ, भूस्खलन सारखे प्रकार अधिक तीव्र व वेगाने होऊ शकतात असा इशारा दिला आहे. ही वेळ या सगळ्याकडे गांभीर्याने पाहण्याची आहे. नाहीतर आपली वाटचाल विकासाच्या कमी आणि विनाशाच्या दिशेने अधिक वेगाने होईल यात शंका नाही." असे खोडद येथील वनस्पती व निसर्ग अभ्यासक राजकुमार डोंगरे यांनी सांगितले.

कोट

"या प्रवासात पुढचं पाऊल म्हणून आपल्याला शासनदरबारी सातत्याने निसर्गस्नेही विकासाचा आग्रह धरावा लागेल. एक वेळ विकास थोडा मंदावला, तरी चालेल पण विनाशाचे धनी होता कामा नये हे पटवून द्यावं लागेल. यामध्ये सर्वसामान्य लोकांनी एकत्र येऊन दबावगट तयार करणं खूप महत्त्वाचं आहे. जुन्नरमध्ये हा बदल देश नव्हे, तर आंतराष्ट्रीय पातळीवर एक उत्तम उदाहरण आपण या माध्यमातून घालून देऊ शकू यात शंका नाही, फक्त सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे."

- राजकुमार डोंगरे, वनस्पती व पर्यावरण अभ्यासक, खोडद

Web Title: Biodiversity crisis in environmentally rich Junnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.