‘ग्रासलॅन्ड सफारी’त उलगडली गवतामधील जैवविविधता !

By श्रीकिशन काळे | Updated: December 24, 2024 16:26 IST2024-12-24T16:24:47+5:302024-12-24T16:26:35+5:30

पुणे वन विभागाचा उपक्रम : तीन हजारांहून अधिक सफारीतून आनंद

Biodiversity in grass revealed in Grassland Safari | ‘ग्रासलॅन्ड सफारी’त उलगडली गवतामधील जैवविविधता !

‘ग्रासलॅन्ड सफारी’त उलगडली गवतामधील जैवविविधता !

पुणे :पुणेकरांना गवताळ प्रदेशावरील जैवविविधता समजावी, तेथील वन्यजीव पाहता यावेत, यासाठी पुणे वन विभागाने पहिल्यांदाच ‘ग्रासलॅन्ड सफारी’ गेल्या वर्षीपासून सुरू केली. याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून, तीन हजारांहून अधिक सफारी झाल्या. त्यामुळे गवताळ प्रदेशाची जैवविविधता सामान्य नागरिकांना पाहता आली आहे.

माळरानावर वेगळ्या प्रकारचे पक्षी, प्राणी व इतर वन्यजीव राहतात. त्यांचे दर्शन घडविण्यासाठी राज्यामध्ये पहिल्यांदाच सफारीचा प्रयाेग पुणे जिल्ह्यात राबविण्यात आला. या सफारीत कोल्हा, चिंकारा, लांडगा, ससे, खोकड, तरस आदी प्राणी यात पाहायला मिळतात. माळरान म्हणजेच गवताळ कुरण या परिसंस्थेत कोल्हा, चिंकारा, लांडगा, ससे, खोकड, तरस आदी प्राण्यांचा अधिवास असून, तो धोक्यात आला आहे. ताे वाचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे.

माळरान म्हटलं की, लोकांना ते पडीक रान वाटते. परंतु, या परिसंस्थेत खूप जैवविविधता असते. त्याची ओळख व्हावी म्हणूनच हा उपक्रम राबविला जात आहे. तत्कालीन उपवनसंरक्षक राहुल पाटील यांना ‘द ग्रासलँड्स ट्रस्ट’च्या वतीने हा प्रस्ताव दिला होता.

पुण्यातील बारामती आणि इंदापूर व सोलापूर जिल्ह्यातील काही भागात असलेल्या गवताळ प्रदेशातील सफारी सुरू करून आता एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभरात अनेक पर्यटकांनी या सफरीचा आनंद लुटला. गेल्या वर्ष भरात वनविभाग व स्थानिक ग्रामस्थांच्या पाठिंब्यामुळे गवताळ प्रदेशातील जैवविविधतेबाबत जनजागृती देखील होत आहे. इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी व बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे सुरू करण्यात आलेल्या सफारीने पर्यटकांना गवताळ प्रदेशातील वन्यजीवांचे दर्शन होत आहे.

या गवताळ प्रदेशात प्रामुख्याने लांडगे, हायना, चिंकारा, कोल्हे, गवताळ प्रदेशातील पक्षी आणि सरपटणारे प्राणी आहेत, ज्यामुळे ते निसर्ग प्रेमी आणि वन्यजीव प्रेमींसाठी एक रोमांचक ठिकाण ठरत आहे.

वर्षभरात वनविभागाने तब्बल ३ हजार ४४ सफारीचे आयोजन केले. या सफरीमुळे स्थानिक कुटुंबीयांना रोजगार मिळाला. सुमारे ३० कुटुंबांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे फायदा झाला आहे.

या सफरीतून कडबनवाडी आणि शिर्सुफळ येथील गाईडने १५ लाख २२ हजार रुपयांची कमाई केली. तर वन विभागाने अतिरिक्त १९,५५,३०० उत्पन्न मिळवले. या सफारीमुळे एकूण ३४,७७,३०० रुपयांचा महसूल मिळाला. यात एकट्या कडबनवाडीने उत्पन्नात ७५ टक्के योगदान दिले आहे.

मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण म्हणाले, गवताळ प्रदेशातील जीवसृष्टीमध्ये खूप वैविध्य असते. ती पडीक जमीन नसते, याची माहिती व्हावे, त्याचे संवर्धन व्हावे म्हणून हा उपक्रम स्तुत्य ठरला. सफारीमुळे स्थानिक नागरिकांच्या रोजगाराच्या व उत्पन्न वाढीसाठी फायदा झाला. गेल्या वर्षभरात इको-टूरिझमला वाव मिळाला.

पुणे विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते म्हणाले,“हा उपक्रम वन विभागाच्या गवताळ प्रदेशांचे संवर्धन करण्यासाठी राबवला. हा वन विभागाचा एक मैलाचा दगड ठरत आहे. आमच्या टीमचे समर्पण आणि स्थानिक लोकांचा सहभाग यामुळे हा प्रकल्प चांगलाच लोकप्रिय होत आहे. 

Web Title: Biodiversity in grass revealed in Grassland Safari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.