तळजाईवरील भूखंडाचा मार्ग मोकळा; पुणे महापालिका उभारणार जैववैविध्य उद्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:11 PM2018-02-10T12:11:10+5:302018-02-10T12:14:59+5:30
तळजाई पठारावर महापालिकेने भूसंपादनाद्वारे घेतलेली जागा परत करण्यासंदर्भात लावण्यात आलेले निकष सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधीच्या पुनर्विचार याचिकेचा निकाल देताना रद्द ठरवले आहेत.
पुणे : येथील तळजाई पठारावर महापालिकेने भूसंपादनाद्वारे घेतलेली जागा परत करण्यासंदर्भात लावण्यात आलेले निकष सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधीच्या पुनर्विचार याचिकेचा निकाल देताना रद्द ठरवले आहेत. त्यामुळे आता या जागेवर महापालिका करणार असलेल्या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिका या जागेवर जैववैविध्य उद्यान तयार करणार आहे.
महापालिकेने या पठारावरील जागा भूसंपादन कायद्यान्वये ताब्यात घेतली होती. त्याविरोधात या जागेची मालकी असणाऱ्यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. महापालिकेने जागा मालकांना नुकसानभरपाई वेळेत दिली नाही. कनिष्ठ न्यायालयात विरोधात निकाल लागला. त्यामुळे या प्रकल्पाला खीळ बसली होती. महापालिकेने उच्च न्यायालयात अपील केले मात्र तिथेही त्यांना विरोधातील निकाल सहन करावा लागला. त्याविरोधा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. तिथेही निकालाविरोधात गेल्यानंतर महापालिकेने पुनर्विचार याचिका दाखल केली.
त्याची त्रिसदस्यीय समितीसमोर सुनावणी होऊन आता न्यायालयाने जागामालकांना द्यायच्या नुकसानभरपाईबाबतचे निकष बदलले आहेत. तळजाई टेकडीवरील ८७ जागामालक न्यायालयात गेलेले होते. पण पुनर्विचार याचिकेत बाजूने निकाल लागल्यामुळे जैववैविध्य उद्यानाचा मार्ग मोकळा झाला आहे.