इंदापुरात नगरपालिकेने उभारले बायोडायव्हर्सिटी पार्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:10 AM2021-01-17T04:10:31+5:302021-01-17T04:10:31+5:30
या वेळी वसुंधरा संवर्धन तसेच स्वच्छतेची शपथ नागरिकांनी घेतली़ राष्ट्रीय पातळीवर शहर स्वच्छतेचे मानांकन इंदापूर नगर परिषदेने सलग ...
या वेळी वसुंधरा संवर्धन तसेच स्वच्छतेची शपथ नागरिकांनी घेतली़ राष्ट्रीय पातळीवर शहर स्वच्छतेचे मानांकन इंदापूर नगर परिषदेने सलग तीन वर्षे संपादन केले असून महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या माझी वसुंधरा या अभियानांतर्गत इंदापूर नगरपालिकेने लोकसहभागातून हरित इंदापूरसाठी शहरात वेगवेगळ्या भागात वृक्षारोपण केले आहे. तसेच भार्गव तलाव परिसरात इंदापूर नगरपालिकेने पाच हजार वृक्ष लागवड केली असून आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह शेजारील परिसरात नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या हस्ते जैवविविधता उद्यानाचे उद्घाटन करून या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
अंकिता शहा म्हणाल्या की,' पर्यावरण संवर्धनासाठी सजावटीच्या माध्यमातून या परिसरात एक संकल्पना साकारली जाणार असून त्यातून नागरिकांच्या सहकार्याने पर्यावरण संवर्धन जोपासण्यासाठीचा प्रयत्न केला जाणार आहे. शहराच्या नैसर्गिक सौंदर्य वृद्धीसाठी जैवविविधता उद्यानाची निर्मिती केली असून हरित इंदापूर ही संकल्पना साकारण्यासाठी नागरिकांनी आपल्या परिसरात वृक्षरोपण आणि संवर्धन करून शहराच्या वैभव वाढवावे.'
मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले की,' बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये हिरडा, बेहडा, आवळा, तुळस, अश्वगंधा, अडुळसा, शतावरी, कोरफड, चंदन,पर्णकुटी, गवती चहा, मारवा यासारख्या देशी २०५ विविध वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. या पार्कची माध्यमातून वेगवेगळे कीटक, पक्षी आकर्षिली जाऊन जैवविविधता वाढीस लागेल. इतर प्राण्यांच्या पासून संरक्षण व्हावे यासाठी या परिसराला कुंपण केले जाणार आहे.
या वेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगरसेवक भरत शहा, जावेद शेख, सागर गाणबोटे, हमीद आतार उपस्थित होत़े कार्यालयीन अधिक्षक वर्षा क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. सुरेश सोनवणे यांनी वसुंधरा संवर्धन व स्वच्छतेची शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्ताफ पठाण यांनी केले. आभार श्रद्धा वळवडे यांनी मानले.
___________________________________
१६ इंदापूर
इंदापूर नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारलेल्या बायोडायव्हर्सिटी पार्कचे उद्घाटन करताना नगराध्यक्षा अंकिता शहा व मान्यवर.