जैवविविधता गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:07 AM2021-03-30T04:07:53+5:302021-03-30T04:07:53+5:30
चित्ररथाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पहाणी चित्ररथाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी बारामती: जिल्हाधिकारी कार्यालय व ...
चित्ररथाची उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी केली पहाणी
चित्ररथाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी
बारामती: जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत तसेच जैवविविधता पूरक गाव संकल्पनेवर आधारित जनगागृतीसाठी चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
बारामती येथील निसर्ग जागर संस्थेच्या डॉ. महेश गायकवाड यांनी जैवविविधता पूरक गाव ही संकल्पना मांडली आहे. याबाबत माहिती देताना डॉ. गायकवाड म्हणाले, जैवविविधतापूरक गाव संकल्पना अर्थात नैसर्गिक अधिवास संरक्षण जैवविविधतापूरक - गाव संकल्पना, हा शासनाचा नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. नैसर्गिकरीत्या गावाचा विकास करीत शाश्वत विकासाची चळवळ रुजविली पाहिजे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील जुनी झाडे जपली पाहिजेत, नवीन वृक्षारोपण करताना स्थानिक प्रजातीलाच प्राधान्य दिले पाहिजे. जुने पाणवठे यात ओढे, तलाव, तळी, नद्या यांचे संरक्षण झाले पाहिजे. जुनी मंदिरे, देवराया, वन्यजीव व जैवविविधता याचे संरक्षण केले पाहिजे. नैसर्गिक अधिवास वाचवून शेती केली पाहिजे. सेंद्रिय शेती करायची असेल तर गांडुळे, विविध पक्षी, मुंग्या व वारुळे, फुलपाखरे, मधमाश्या यांना वाचविणे आवश्यक आहे. शिवाय बांधावरच्या काटेरी बोरी व साधीबाभळ, आंबा, जांभूळ, भोकर अश्या झाडांचे संरक्षण केले पाहिजे. गावाभोवतीची जगल, माळरान वाचलीच पाहिजेत. वनवे थांबवले पाहिजेत. वनवा लावणाऱ्यांविरुद्ध वन विभागाकडे तक्रारी दिल्या पाहिजेत, तरच वणवे नियंत्रणात येतील. जंगले व माळरान वाचली तरच वन्यजीव वाचतील. जैवविविधता टिकेल, तरच मानव वाचू शकतो.
गवत वाढले तर भूजल वाढेल...
गावालगत असणारी वड, पिंपळ, चिंच,जांभूळ अशी स्थानिक झाडे वाचली तरच पक्ष्यांच्या वसाहतीसह घारी, बगळे, पानकावळे, पोपट, घुबड चित्रबलाक असे पक्षी वाचतील. गावात प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी घालून त्यावर पर्यायी कापडी पिशव्या तयार करणे, गांडूळखत निर्मिती असे अनेक उपाय केले पाहिजेत. कचरामुक्त गाव करणे, ही बाब गावासाठी अत्यंत अभिमानाची मानली पाहिजे. जलसंधारण हा विषय समजून घेऊन कार्य केले पाहिजे, गवताच्या काडीला महत्त्व देऊन काम केले तरच शाश्वत जलसंधारण होईल, कारण गवत वाचले तर ओलावा टिकतो आणि तरच झाडे वाढतील, तरच भूजल पातळीत वाढ होईल. हे ध्यानात घेणे आवश्यक आहे, म्हणून गवत वाढले तरच यशस्वी व शाश्वत जलसंधारण होईल.
जैवविविधतापूरक - गाव संकल्पनेवर आधारित चित्ररथाची पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार.
२९०३२०२१-बारामती-०५