क्रोकोडाइल हंटरची जीवकहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:11 AM2021-05-16T04:11:16+5:302021-05-16T04:11:16+5:30

स्टीव्ह बॉब इरविन (द ग्रेट क्रोकोडाइल हंटर). ऑस्टेलियाच्या मातीत जन्मलेला एक अस्सल अरण्यप्रेमी. साहस, सामर्थ्य, सहजता आणि अविचल सेवाभाव ...

Biography of Crocodile Hunter | क्रोकोडाइल हंटरची जीवकहाणी

क्रोकोडाइल हंटरची जीवकहाणी

Next

स्टीव्ह बॉब इरविन (द ग्रेट क्रोकोडाइल हंटर). ऑस्टेलियाच्या मातीत जन्मलेला एक अस्सल अरण्यप्रेमी. साहस, सामर्थ्य, सहजता आणि अविचल सेवाभाव याचा त्याच्या ठायी सुरेख संगम. डिस्कव्हरी व अ‍ॅनिमल प्लॅनेट या वाहिन्यांवर स्टीव्हला पाहिलंच नाही असा प्रेक्षक सापडणं कठीण. ऑस्टेलियातील मेलबर्ननजीकच्या 'अप्पर फर्न ट्री गली' या शहरात स्टीव्हचा जन्म झाला. स्टीव्हची आई ‘लीन’ या अनेक अडलेल्या प्राण्यांची प्रसूती करणाऱ्या सुईणीचं काम मोठ्या हातोटीने करत.

प्राणिप्रेमानं पछाडलेल्या या दाम्पत्यानं आपला आठ वर्षांचा मुलगा स्टीव्ह आणि मुली जॉय व मॅण्डी यांच्या साथीनं क्वीन्सलॅण्ड या ठिकाणी ‘बिरवाह रेपटाईल पार्क’ या नावानं एक छोटंसं प्राणीसं गोपनालय उभं केलं. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी स्टीव्हनं जगातील अतिविषारी अशा ‘रेडबेलीज’ सापांना मोठ्या कुशलतेनं पकडलं. नवव्या वर्षी नदीच्या पाण्यात उतरून चक्क त्याच्या उंचीएवढी मोठी मगर पकडली. कुमारवयात स्टीव्हनं वडिलांच्या साथीनं अनेक संकटग्रस्त मगरींची सुटका केली.

अमेरिकेतील ‘ओरेगॉन’ प्रांतात राहणारी व सिंह आणि तत्सम हिंस्त्र अशा अनेक वन्यप्राण्यांच्या उर्जितावस्थेसाठी झटणारी एक प्राणिप्रेमी नवयुवती ‘टेरी रेनीस’ ही पर्यटनाच्या उद्देशानं ऑस्टेलियात दाखल झाली. तिने इरविन कुटुंबीयांच्या ‘बिरवाह रेपटाईल पार्क’ ला भेट दिली. या पार्कमध्ये मगरींचे शो पार पाडणाऱ्या निर्भीड परंतु लाजाळू स्वभावाच्या स्टीव्हशी तिची नजरानजर झाली. त्या शोमध्ये मगरींविषयी माहिती देणाऱ्या स्टीव्हचं साहस, त्याचं संवेदन, व्यासंग भावला. या युगुलानं लग्नाचा निर्णय घेतला अन् इथूनच सुरू झाला प्राणी संवर्धन - संगोपनाचा एक अध्याय.. कोआला, कांगारू, डिं गो, हत्ती, वाघ, टास्मानियन वाघ, ओरांगउटान, अजगर, कमोडोड्रॅगन, गरूड, देवमासे, सुसर, मगर, पेंग्वि न, लेपर्डसील्स, पॉसम्स, कासव यांसारख्या शेकडो जातीच्या पशुपक्ष्यांना स्टीव्ह आणि टेरी यांनी हक्काचं आश्रयस्थान मिळवून दिलं. बिरवाह रेपटाईल पार्क या प्राणीसं गोपनालयाचा विस्तार वाढविला. त्याचे नामकरण ‘ऑस्टेलिया झू’ असं केलं. एक हजार एकरांपेक्षा अधिक जागेवर स्थापित असणाऱ्या या झूमध्ये काही हजार प्राणी अगदी निर्घाेरपणे वास्तव्य करीत आहे.

मगर.... शेकडो वर्षापासून पृथ्वीवर स्वत:चे अस्तित्व टिकवून अधिवास करणारा एक पुरातन, महाकाय प्राणी. नाव जरी घेतलं तरी अंगावर सरसरून काटा उभा राहतो. विक्राळ जबडा, कराल पाय, अगडबंब देह नि प्रचंड ताकदीची शेपूट. आपल्या सावजाचा काही सेकंदात फडशा पाडणारे भयंकर दात. सृष्टीने सर्वच प्राण्यांना जगण्याचा समान अधिकार दिला असताना मानवानं स्वत:च्या फायद्यासाठी या प्राण्यांच्या जीवनात अघोरी हस्तक्षेप केला आहे. हे पटवून देण्यासाठी स्टीव्हनं विविध माहितीपट, शोज, सिनेमे इत्यादींच्या माध्यमांतून लोकजागृती केली.

4 सप्टेंबर 2006 रोजी ओशन डेडलीएस्टह् या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी स्टीव्ह बॅटरीफ या बेटावर गेला होता. खोल समुद्रात उतरला असताना स्टींग रे या माशाचा अणुकुचीदार विषारी काटा स्टीव्हच्या काळजात घुसला. वयाच्या अवघ्या 44 व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. आज स्टीव्हच्या पश्चात त्याची पत्नी टेरी इरविन सासरे बॉब, मुलगी बिंडी आणि मुलगा रॉबर्ट यांच्या साथीनं ‘ऑस्ट्रेलियाझू’ हे त्याचं प्राणिसंग्रहालय सांभाळत आहेत. त्यांची ही कहाणी मराठी वाचकांपर्यंत पोहोचावी असे वाटते.

Web Title: Biography of Crocodile Hunter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.