जीव आणि रसायन ही शास्त्रे एकत्र आणावी लागतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:12 AM2021-04-02T04:12:45+5:302021-04-02T04:12:45+5:30

राहुल शिंदे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “युरोप व अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये संशोधनासाठी त्यांच्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या सुमारे ...

Biology and chemistry have to be brought together | जीव आणि रसायन ही शास्त्रे एकत्र आणावी लागतील

जीव आणि रसायन ही शास्त्रे एकत्र आणावी लागतील

googlenewsNext

राहुल शिंदे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “युरोप व अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये संशोधनासाठी त्यांच्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या सुमारे पाच ते सहा टक्के निधी संशोधनावर खर्च केला जातो. मात्र, भारतात हा खर्च दोन टक्‍क्‍यांपर्यंत होताना दिसतो. भारताला प्रगत देश म्हणून जगासमोर यायचे असेल तर आपल्याला संशोधनावरील खर्च वाढवावा लागेल. तसेच देशातंर्गत संशोधन संस्थांना अधिक सक्षम करावे लागेल,” असे मत डॉ. आशिष लेले यांनी व्यक्त केले. जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन्ही क्षेत्रांना एकत्र आणल्यास त्याला खूप मोठे भविष्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) नवनियुक्त संचालक म्हणून डॉ. आशिष लेले यांनी नुकताच पदभार स्विकारला. या निमित्ताने ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला. एनसीएलच्या पुढील वाटचालीबद्दल यावेळी डॉ. लेले यांनी चर्चा केली.

डॉ. लेले म्हणाले की, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन्ही क्षेत्रांना एकत्र आणावे लागणार आहे. एनसीएलमध्ये आवश्यक मनुष्यबळ, शास्त्रज्ञ आणि उत्तम प्रयोगशाळा आहेत. फाईन आणि स्पेशलिटी केमिकल इंडस्ट्री ही भारतात मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, या इंडस्ट्रीत वापरले जाणारे तंत्रज्ञान खूप जुने झाले आहे. त्यात अनेक दोष असून त्यामुळे प्रदूषणही वाढत आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान बदलून सुधारित चांगले आणि स्वस्त तंत्रज्ञान आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. तसेच ‘क्लीन एनर्जी’ या क्षेत्रात भारताला प्रचंड काम करायचे आहे. भारताने कोरोनावर लस निर्माण करून जगभर त्याची निर्यात केली. त्याच पद्धतीने क्लीन एनर्जीची निर्मिती करून आपण जगाला पुरवठा करू करू शकतो.

“हायड्रोजन एनर्जीचे इलेक्ट्रिसिटीमध्ये रूपांतर करण्याच्या प्रकल्पावर मी काम केलेले आहे. त्यातून खूप शिकायला मिळाले,” असे डॉ. लेले म्हणाले. त्यांनी सांगितले की, भारतासह परदेशात कोरोनामुळे प्रदूषणाची पातळी प्रचंड खाली आली. मुंबईत कधीही आकाश निरभ्र दिसले नाही. मात्र टाळेबंदीमुळे प्रदूषण कमी झाले आणि हे दुर्मिळ दृश्य पाहता आले. पंजाबमधून हिमालय दिसल्याच्या घटना समोर आल्या. जगभरात असे चित्र होते. एकूणच क्लीन एनर्जीमुळे प्रदूषण कमी होते हे सर्वांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे सौर उर्जा, पवन उर्जा याला अधिक प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. या दृष्टीने काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत या क्षेत्रात काम करण्यासाठी अनेक कंपन्यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येते.”

चौकट

उद्यावर नजर

“शास्त्रज्ञ असल्यामुळे पुढे काय होईल, याचा विचार आम्ही करत असतो. आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससह विविध क्षेत्रात पुढील पाच-दहा वर्षात जे तंत्रज्ञान येईल आणि ज्याचा वापर होईल, त्यावरच संशोधन करावे लागेल. त्यासाठी लागणारे संशोधक, निधी पायाभूत सुविधा, हे सर्व उभारण्यासाठी एनसीएलच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील,” असे डॉ. आशिष लेले यांनी स्पष्ट केले.

चौकट

कोरोनाने पटवून दिले महत्त्व

“कोरोना काळात जगाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व पुन्हा एकदा समजले. या काळात पहिल्यांदाच असे घडले की एका वर्षातच अतिशय उच्च तंत्रज्ञान वापरून एक नव्हे तर चार लशी तयार झाल्या. एका वर्षात असे घडल्याचे उदाहरण इतिहासात नाही. कोरोना काळात विज्ञान-तंत्रज्ञानाने दिलेल्या लढ्याला खूप मोठे महत्त्व आहे. आपल्या तरुण पिढीच्याही हे लक्षात आलेले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व त्यांना समजले आहे. त्यामुळे तरुण पिढी विज्ञान क्षेत्रात करिअरसाठी पुढे येईल अशी अपेक्षा आहे.”

-डॉ. आशिष लेले, संचालक, एनसीएल

-------

Web Title: Biology and chemistry have to be brought together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.