एमपीएससी’च्या सर्व परीक्षांना बायोमेट्रिक हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 06:53 PM2018-12-24T18:53:30+5:302018-12-24T19:04:45+5:30
यापुढील पुर्व परीक्षांसाठीही आता ही पध्दत अवलंबण्यात येणार आहे.
पुणे : बोगस विद्यार्थ्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग(एमपीएससी) आता मुख्य परीक्षांसह सर्व पुर्व परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याच्या विचारात आहे. यापुर्वी तीन-चार मुख्य परीक्षांना ही पध्दत वापरण्यात आली. तर रविवारी (दि. २३) पहिल्यांदाच आयोगाने महिला व बाल विकास विभागाच्या गट ब पदाच्या पुर्व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी घेतली. यापुढील पुर्व परीक्षांसाठीही आता ही पध्दत अवलंबण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या विविध विभागातील भरतीसाठी आयोगामार्फत परीक्षा घेतल्या जातात. थेट भरती, स्पर्धात्मक परीक्षा, विभागीय परीक्षा, मर्यादीत परीक्षा घेतल्या जातात. प्रामुख्याने थेट भरती व स्पर्धात्मक परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांची संख्या लाखोच्या घरात असते. स्पर्धात्मक परीक्षा या साधारणपणे पुर्व, मुख्य व मुलाखत या स्वरूपाच्या असतात. तर थेट भरती परीक्षांमध्ये पुर्व व मुलाखत अशी प्रक्रिया असते. पुर्व परीक्षेच्या तुलनेत मुख्य परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची संख्या खुप कमी असते. त्यामुळे आयोगाने सुरूवातीला मुख्य परीक्षांसाठी बायोमेट्रिक हजेरी घेण्यास सुरूवात केली. मागील काही महिन्यांत झालेल्या तीन ते चार परीक्षांसाठी ही हजेरी घेण्यात आली. पण पुर्व परीक्षेसाठी आतापर्यंत बायोमेट्रिकचा वापर करण्यात आला नव्हता. आयोगाकडे सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक आहेत. त्याआधारे विद्यार्थ्यांची ओळख पटविणे शक्य होणार आहे.
रविवारी (दि. २३) आयोगामार्फत निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, अधिक्षक, अधिव्याख्याता, सांख्यिकी अधिकारी गट ब या पदांसाठी पुर्व परीक्षा घेतली. या परीक्षेसाठी सर्व केंद्रांवर बायोमट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली होती. एखाद्या पुर्व परीक्षेसाठी पहिल्यांदाच अशी चाचपणी करण्यात आली. परीक्षा कक्षामध्ये जाण्यापुर्वीच विद्यार्थ्यांच्या अंगठ्याचा ठसा आणि छायाचित्र घेण्यात आले. या प्रक्रियेनंतर ओळखपत्राच्या झेरॉक्सवर हॉलमार्क लावण्यात आले. त्यानंतरही परीक्षा कक्षात प्रवेश दिला जात होता. तसेच परीक्षेवेळीही छापील छायाचित्रासमोर अंगठ्याचा ठसा घेतला गेला. बहुतेक विद्यार्थ्यांसाठी हे नवीन होते. पण बोगस विद्यार्थी टाळण्यासाठी ही प्रक्रिया योग्य असल्याची प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी दिली.