बायाेमेट्रिक हजेरीचे मशीन बंद; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना फुकटचा पगार, वरिष्ठांच्याच दांड्या
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: June 11, 2023 04:00 PM2023-06-11T16:00:09+5:302023-06-11T16:00:21+5:30
एकाही रुग्णाला दाखल केले जात नाही, सकाळी साडेआठची वेळ असताना येथील डाॅक्टर, सिस्टर व कर्मचारी निवांत साडेदहा - अकरा वाजता येतात.
पुणे : पाैड येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय आणि रुग्णसेवा फक्त नावालाच उरली आहे. रुग्णालयाचे वैदयकीय अधीक्षक, सहायक अधीक्षकच आठवडयातून एक ते दाेन वेळा चक्कर मारतात. मग, इतर स्टाफ जसे डाॅक्टर, नर्स यांचे तर बाेलायलाच नकाे. रुग्णालयाचा सर्व कारभार रामभराेसे चालला आहे. विशेष म्हणजे राेज यावे लागु नये म्हणून बायाेमेट्रिक हजेरीचे मशीनवर पाणी टाकून बिघडवण्यात आले आहे. मात्र, येथील सर्व स्टाफचा महिन्याचा २० लाख रूपयांचा संपूर्ण पगार मात्र, बिनबाेभाटपणे मिळत आहे.
बायाेमेट्रिक हजेरीद्वारेच पगार काढा असे निर्देश सार्वजनिक विभागाचे आयुक्त धीरज कुमार यांनी सर्व आराेग्य परिमंडळांना काढले आहेत. तसेच पुणे परिमंडळचे आराेग्य उपसंचालक डाॅ. राधाकिशन पवार यांनीही गेल्यावर्षी नाेव्हेंबरमध्ये हे आदेश तीनही जिल्हयांतील आराेग्य यंत्रणांना काढले हाेते. सध्या सर्वच ठिकाणी बायाेमेट्रिक यंत्र बसवण्यात आलेले आहे. परंतू, बायाेमेट्रिक यंत्र म्हणजे राेजची हजेरी आलीच. मात्र, पाैड ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यावरही ‘साेल्युशन’ काढले अन त्यावर पाणी टाकूनच ते बिघडवून बंद केल्याचा प्रताप केला असल्याची माहीती येथील सूत्रांनी दिली. तसेच, याची वरिष्ठ अधिका-यांनी खात्री करायची असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे तपासावेत त्यावेळी सत्य समाेर येईल, असेही सांगण्यात आले.
पाैड ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे पाेस्ट माॅर्टम करण्यासाठी येथे शिपायी पाच पाच हजार रूपये घेताे. सकाळी साडेआठची वेळ असताना येथील डाॅक्टर, सिस्टर व इतर कर्मचारी निवांत साडेदहा अकरा वाजता येतात. एकाही रुग्णाला दाखल केले जात नाही. इतकेच काय तर येथे एकही प्रसूती हाेत नाही. प्रसूतीसाठी महिला आल्यास किंवा एखादया रुग्णाला ॲडमिट करण्याची गरज पडल्यास सरळ डायल १०८ रुग्णवाहिकेने रुग्णाला जिल्हा रुग्णालयात रेफर केले जाते. त्यामुळे एकही पेशंट ॲडमिट नसताे. आता रुणालयातील आराेग्य यंत्रणेच्या कामचुकारपणाबाबत गावक-यांनीच थेट आवाज उठवला आहे. त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक, आराेग्य उपसंचालक, आराेग्यमंत्री यांना पत्र पाठवून याबददल संताप व्यक्त केला आहे. आता यावर वरिष्ठ आराेग्य अधिकारी काय ॲक्शन घेतात हे लवकरच कळणार आहे.