पालिका शाळांत बायोमेट्रिक हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 01:20 AM2018-05-18T01:20:25+5:302018-05-18T01:20:25+5:30
शहरातील महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची हजेरीपटावरील संख्या व प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या यांमध्ये मोठी तफावत असते.
पुणे : शहरातील महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची हजेरीपटावरील संख्या व प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या यांमध्ये मोठी तफावत असते. यामुळे महापालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविताना अडचणी येतात व गैरव्यवहार झाल्याचे समोर आले. यामुळे यापुढे विद्यार्थ्यांची हजेरीदेखील बायोमेट्रिक पद्धतीने घेण्यात आली असून, लवकरच स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात येईल, अशी माहिती उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले.
महापालिकेच्या शिक्षण आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची अति. पालिका आयुक्त शीलत उगले-तेली आणि उपमहापौरांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक झाली. या बैठकीत शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या कामाचा आढावा घेऊन अनेक निर्णय घेण्यात आले. या निर्णयांची माहिती देताना धेंडे यांनी सांगितले, की सन २०१८-१९च्या शैक्षणिक वषार्साठी पालिकेच्या शाळांध्ये पहिली ते ८वीसाठी ७६ हजार ४०० विद्यार्थी आहेत. यात मराठी माध्यमासाठी ५२ हजार २०४, इग्रजी माध्यमासाठी १७ हजार २७२, उर्दू माध्यमासाठी ६ हजार ४६४ आणि कन्नड माध्यमासाठी ४०७ विद्यार्थी आहेत. तर, ९ वी आणि १० वीसाठी १६ हजार विद्यार्थी आहेत.
या विद्यार्थ्यांवर गेल्या वर्षभरात डीबीटीच्या माध्यमातून १६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. डीबीटी योजनेमध्ये मागील वर्षी ज्या त्रुटी जाणवल्या, त्या दूर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या नावे बँक खात्यात पैसे जमा केल्यानंतर शालेय साहित्य खरेदी केले जाईलच, असे नाही. ते पैसे इतर कामासही वापरले जाऊ शकते असेही डॉ. धेंडे यांनी सांगितले.
>मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये ३२५ शिक्षकांची पदे रिक्त
दरम्यान, महापालिकेकडून शाळा सुरू केल्या जातात; मात्र शाळांमध्ये पुरेसा शिक्षकवर्ग नाही. मराठी माध्यमांच्या शाळांसाठी १ हजार ९९८ शिक्षकांच्या पदांना मान्यता असताना प्रत्यक्षात १ हजार ६२९ शिक्षकच कार्यरत आहेत. ३२५ पदे रिक्त आहेत. उर्दू माध्यमाच्या शाळांमधील २६१ मान्य पदांपैकी ८४ पदे रिक्त आहेत. तर, इंग्रजी माध्यमातील शाळांसाठी ५७६ मान्य पदांपैकी ३१३ पदे रिक्त आहेत. शिक्षण विभागाचा आकृतिबंध त्वरित करावा, म्हणजे ही पदे भरता येतील. दरम्यान मागील वर्षी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरण्यात आलेल्या १३८ शिक्षकांना पुन्हा मुदतवाढ देण्याची आणि त्यांचे मानधन दरमहा १० हजारांवरून २० हजार रुपये करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, इंग्रजी माध्यमाच्या ७ शाळा नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात ाल्याचेही उपमहापौर डॉ. धेंडे यांनी सांगितले.