बिरंगुडी सहकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:10 AM2021-04-01T04:10:24+5:302021-04-01T04:10:24+5:30
बारामती: कोरोना संकटामुळे शेतमालाच्या बाजारभावात घसरण झाल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. मात्र, या परिस्थितीवर मात करत बिरंगुडी (ता. इंदापूर) ...
बारामती: कोरोना संकटामुळे शेतमालाच्या बाजारभावात घसरण झाल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. मात्र, या परिस्थितीवर मात करत बिरंगुडी (ता. इंदापूर) येथील शेतकऱ्यांनी शेती पिकांचे योग्य नियोजन केल्याने बिरंगुडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची मार्चअखेर पीक कर्जवसुली शंभर टक्के झाली आहे. संस्थेच्या सभासदांना कोट्यवधी रुपयांहून अधिक कर्ज वाटप करण्यात आले होते. या सर्व कर्जाचा शेतकऱ्यांनी भरणा केला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सतीश सांगळे यांनी दिली.
संस्थेची सलग चार वर्षे शंभर टक्के पीक कर्जवसुली करण्यात येत आहे. कळस (ता.इंदापूर) येथील या संस्थेच्या माध्यमातून सभासदांना दर वर्षी ऊसशेतीसह डाळींब, द्राक्षे या फळबागांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्जपुरवठा जिल्हा बँकेच्या माध्यमातून केला जातो, गतवर्षी वाटप करण्यात आलेल्या कर्जाची वसुली शंभर टक्के झाली आहे. सभासदांना एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यापासून कर्जवाटप करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सुमारे ४ कोटी रुपयांचा पत आराखडा मंजूर आहे. मागणीप्रमाणे सर्व सभासदांना कर्ज वितरित करण्यात येणार आहे, संस्थेचे स्वमालकीचे भागभांडवल २७ लाख रुपये आहे वार्षिक उलाढाल २ कोटी रुपये झाली आहे नियमित वेळेत कर्ज भरणा झाल्याने सभासदांना शून्य टक्के व्याजदराचा फायदा झाला आहे. संस्थेचे सचिव आबासाहेब नाझरकर, जिल्हा बँकेचे निरीक्षक बाबासाहेब धायतोंडे, संस्थेचे संचालक दादा सांगळे,पोपटराव सांगळे,पप्पु सांगळे,रघुनाथ सांगळे, तात्याराम सांगळे लक्ष्मण खारतोडे,अजित पाटोळे,उत्तम शिंदे, संभाजी सपकळ,हनुमंत जामदार, सुनीता सांगळे,मनीषा पवार यांनी सहकार्य केले.